-गणेश वासनिक, अमरावती राज्याच्या वन विभागात भारतीय वनसेवेतील (आयएफएस) अधिकारी सोईनुसार पदे निर्माण करून हव्या तशा पोस्टिंग मिळवित असल्याचे वास्तव आहे. वनविभागात आता आठ प्रधान मुख्य वनसंरक्षकांची पदे झाली असून, वनसंरक्षक हे पद हद्दपार करण्यात आले आहे. नियमांना छेद देत मर्जीनुसार पदे निर्माण केले जात आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महसूल व वनविभागाने १७ जुलै रोजी आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी केली आहे. या पदस्थापनेच्या यादीत गत काही वर्षांपूर्वी हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी नाव आलेले एम. श्रीनिवास रेड्डी यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून बढती मिळाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अर्थ व नियोजन विभागात ठाण मांडून बसलेले कल्याणकुमार यांना हलविण्यात आले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. तर, बदली यादीनुसार आयएफएस लॉबी राज्य शासनाला जुमानत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
जी पदे आयएफएस दर्जाची नाही, अशा ठिकाणी पदे निर्माण करून राज्य सेवेतील वन अधिकाऱ्यांच्या पदावर संक्रांत आणली आहे. मराठी आयएफएस अधिकाऱ्यांना बदल्यांमध्ये दुय्यम स्थान दिले जात असल्याने वनविभागात शीतयुद्धाची शक्यता बळावली आहे.
वनसंरक्षकांची पदे हद्दपार
उपवनसंरक्षक यानंतर वनसंरक्षपदाची साखळी वनविभागात तुटल्याची दिसून येते. कारण, सामाजिक वनीकरणात अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, संचालक कुंडल (सांगली) या उपवनसंरक्षक दर्जाच्या पदावर आयएफएस देण्यात आले आहे. तर यवतमाळ प्रादेशिकमध्ये मुख्य वनसंरक्षकाचे पद निर्माण करण्यात आले आहे. सध्या ‘सीएफ’ हे पद गुंडाळण्याचे काम सुरू झाले आहे. वन प्रशासन अकादमी कुंडल (सांगली) येथे दोन आयएफएस जागा निर्माण करण्यात आल्या आहेत.
मराठी अवॉर्ड आयएफएस साइडला
दीड महिन्याच्या कालावधीनंतर विभागीय वनाधिकाऱ्यांना आयएफएस पोस्टिंग देण्यात आली. यामध्ये २२ मराठी आयएफएस अधिकाऱ्यांना साइड पोस्टिंग दिली असून, योगेश वाघाये, राम धोत्रे व मोहन नायकवाडी या केवळ तीन अधिकाऱ्यांना प्रादेशिक विभाग मिळाले आहे. १९ अधिकाऱ्यांना साइड पोस्टिंगवर समाधान केले आहे. त्यामुळे डायरेक्ट आयएफएस आणि अवॉर्ड आयएफएस असा भेदाभेद केल्याची भावना निर्माण झाली आहे.