गॅलरीचे रेलिंग तुटले; आठ विद्यार्थी जखमी
By Admin | Updated: February 8, 2016 00:15 IST2016-02-08T00:15:42+5:302016-02-08T00:15:42+5:30
शिकवणी वर्गातील इमारतीच्या गॅलरीचे लोखंडी कठडे तुटल्याने आठ विद्यार्थी पहिल्या माळ्यावरून खाली कोसळले.

गॅलरीचे रेलिंग तुटले; आठ विद्यार्थी जखमी
राजापेठ परिसरातील घटना : शिकवणी वर्गाच्या इमारतीमधील प्रकार
अमरावती : शिकवणी वर्गातील इमारतीच्या गॅलरीचे लोखंडी कठडे तुटल्याने आठ विद्यार्थी पहिल्या माळ्यावरून खाली कोसळले. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास राजापेठ स्पोर्टिंग क्लबजवळील इमारतीमध्ये घडली. आठही जखमी विद्यार्थ्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने मोठी हानी टळली.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केटजवळ राजापेठ स्पोर्टिंग क्लॅब असून त्या शेजारी शैलेंद्र सलुजा यांची इमारत आहे. त्यांच्या इमारतीमध्ये रिलायबल टेस्ट सिरीजचे शिकवणी वर्ग असून विरुळकर, ठाकरे व उंबरकर हे शिक्षक इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवितात. रविवारी रिलायबल टेस्ट सिरीजच्यावतीने सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. दुपारी २ वाजता सेमिनार सुरु झाल्यावर तो ३ वाजेपर्यंत चालला. त्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान काही विद्यार्थी वर्ग शिक्षकांना काही अडचणी सांगण्यासाठी इमारतीच्या गॅलरीतील लोखंडी कठड्याला टेकून उभे होते. दरम्यान अचानक लोखंडी कठडे तुटल्याने आठ विद्यार्थी कठड्यासह पहिल्या माळ्यावरून खाली कोसळले. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले.