शहरात विविध भागात चालला गजराज

By Admin | Updated: May 4, 2017 00:10 IST2017-05-04T00:10:04+5:302017-05-04T00:10:04+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाद्वारे बुधवारी शहराच्या विविध भागातील अतिक्रमण हटविण्यात आले.

Gajraj goes to different parts of the city | शहरात विविध भागात चालला गजराज

शहरात विविध भागात चालला गजराज

अतिक्रमण हटविले : इतवारा-वलगाव मार्गाने घेतला मोकळा श्वास
अमरावती: महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाद्वारे बुधवारी शहराच्या विविध भागातील अतिक्रमण हटविण्यात आले. सकाळी ८ वाजतापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही मोहीम सुरू केली. यावेळी साहित्य जप्ती देखील करण्यात आली. जेसीबीचा वापर करून अतिक्रमणाने आवळलेले रस्ते मोकळे केल्याने वाहतुकीसाठी अनेक रस्ते मोकळे झाले आहेत.
शहरातील रेल्वे स्टेशन चौक ते बस स्थानक मार्ग, मालटेकडी, बांधकाम बी.अँड.सी. चौक, जिल्हा कोषगार कार्यालय या मुख्य रस्त्यावरील तसेच फुटपाथवरील नाश्त्याच्या गाड्यांसह फळविक्रेत्यांनी त्यांच्या हातगाड्या लाऊन केलेले अतिक्रमण महापालिका पथकाद्वारे हटविण्यात आले. अतिक्रमणधारकांचे काही साहित्य देखील जप्त करण्यात आले. तेथून सकाळी १० वाजता रेल्वे स्थानक चौकात अतिक्रमण निर्मुलन पथक पोहोचले. पोलीस संरक्षणात येथून हे संपूर्ण पथक चित्रा चौक ते इतवारा बाजार, वलगाव रोड या मार्गावर पोहोचले. इतवारा बाजार ते वलगाव मार्गावरील ‘सागर प्लास्टिक’ या प्रतिष्ठानाने दुकानासमोरील नालीवर पक्क्या ओट्याचे बांधकाम करून त्यावर ‘ग्रीन नेट’चे गठ्ठे ठेवले होते. हे पक्के बांधकाम हटवून हा मार्ग मोकळा करण्यासंदर्भात वारंवार महापालिकेने सागर प्लास्टिकच्या संचालकांना सूचना दिल्यात. मात्र, दुकानमालकाने हे अतिक्रमण न हटविल्याने अखेरीस महापालिकेने बुधवारी जेसीबीचा वापर करून हे अतिक्रमणातील बांधकाम उद्धवस्त केले.
येथून अतिक्रमण निर्मुलन पथकाने ताहेर अली हार्डवेअर व इस्माईल कटपीस या प्रतिष्ठानांकडे कूच केले. या दोन्ही दुकानदारांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीवर साहित्य ठेऊन तसेच पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करून केलेले अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना देण्यात आल्यात. ईस्माईल कटपीस ते जवाहर गेट, टांगा पडाव मार्गावरील दुकानासमोरील पार्किंगच्या जागेवर केलेले ओट्याचे बांधकाम तोडण्यात आले. अतिक्रमण निर्मुलन पथकाने यानंतर तहसील कार्यालय, प्रभात चौक मार्गावरील अतिक्रमण हटवून हा मार्ग मोकळा केला. काही ठिकाणी किरकोळ साहित्य जप्ती देखील करण्यात आली. गौदुग्ध हॉटेलसमोरील रस्त्यावर ठेवलेला लोखंडी खोका यावेळी पथकाने जप्त केला. या कारवाई दरम्यान जवळपास तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
कारवाईमध्ये अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यासह निरीक्षक विजय गावंडे, प्रवीण इंगोंले, उमेश सवाई, अतिक्रमण पोलीस पथकातील सुनील जामनेकर आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

फुले विक्रेत्यांना २४ तासांचा अवधी
जवाहर गेट समोरील फुले विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला केलेले अतिक्रमण काढण्याबाबत त्यांना तोेंडी सूचना देण्यात आला व हे अतिक्रमण हटविण्यासाठी २४ तासांचा अवधी देण्यात आला.

Web Title: Gajraj goes to different parts of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.