गजानन भक्तीत रमले बडनेरावासी, पादुकांचा दोन दिवस मुक्काम
By Admin | Updated: November 8, 2014 00:42 IST2014-11-08T00:42:34+5:302014-11-08T00:42:34+5:30
गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी बडनेऱ्यात ठिकठिकाणी भाविकभक्तांनी गर्दी केली होती.

गजानन भक्तीत रमले बडनेरावासी, पादुकांचा दोन दिवस मुक्काम
अमरावती : गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी बडनेऱ्यात ठिकठिकाणी भाविकभक्तांनी गर्दी केली होती. दोन दिवस महाराजांच्या पादुका दर्शनासाठी होत्या. भव्य शोेभायात्रा देखील काढण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथील भाविक भगवानराव देशमुख यांना १९०८ मध्ये स्वत: श्री संत गजानन महाराजांनी त्यांच्या पादुका दिल्याची आख्यायिका आहे. या पादुका दोन दिवस बडनेरा शहरात होत्या. यवतमाळ मार्गावरील श्रीराम मंदिरापासून पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली. पुढे याच पादुका नव्या वस्तीतील नरेंद्र देवरणकर यांच्या निवासस्थानी मुक्कामी होत्या. दरम्यान भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुसऱ्या दिवशी या पादुका कंपासपुऱ्यातील विनोद आमले यांच्या निवासस्थानी होत्या. नंतर पादुकांची शोभायात्रा काढून माळीपुरास्थित गजानन महाराजांचे मंदिरात ठेवण्यात आल्या. येथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर या पादुकांनी पुढे प्रस्थान केले. बडनेऱ्यात गजानन महाराजांचा मोठा भक्तगण आहे. दर गुरुवारी शेगावला जाणाऱ्यांची संख्या बडनेऱ्यात मोठ्या प्रमाणात आहे. माळीपुऱ्यात श्रींच्या प्रतिमेसमोर दर गुरुवारी आरती केली जाते. संत गजानन महाराजांच्या पादुकांचे स्वागत करण्यासाठी रस्त्यांवर ठिकठिकाणी सुरेख रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.