टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण
By Admin | Updated: April 8, 2015 00:29 IST2015-04-08T00:29:47+5:302015-04-08T00:29:47+5:30
जिल्ह्यात नवीन विद्युत लाईनचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर मोठमोठे टॉवर्स उभे करण्यात येत आहे...

टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण
आंदोलन : शेतजमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी
अमरावती: जिल्ह्यात नवीन विद्युत लाईनचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर मोठमोठे टॉवर्स उभे करण्यात येत आहे. टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा यासाठी भारतीय टेलिग्राफ कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरु आहे.
शेतकऱ्याच्या लाखो रूपये किंमतीच्या शेत जमिनीवर विद्युत टॉवर्स उभे केले जात आहेत .मात्र यापोटी त्यांना कुठलाही मोबदला देण्यात येत नाही. परंतु ५ ते ६ गुंठे शेतीची जागा घेतली जाते.हि जागा भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५ च्या कलम १६ (१) नुसार घेतली जाते . त्यामुळे या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. अशा विविध पिळवणुकीमुळे शेतकरी कंटाळले आहेत. यासोबतच नापीकी, दुष्काळ, कर्ज बाजारीपणा अशा विविध कारणांमुळे शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे. आता टॉवर हे कारण आत्महत्येसाठी ठरु नये असे शेतकऱ्यांना वाटत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ४०० के.व्ही.च्या पुढील विद्युत टॉवरचे काम करण्यात आले आहेत. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम म्हणून १० लाख रुपये द्यावेत, टॉवरचे तीन पाय जमिनीवर आल्यास ७.५० लाख रुपये द्यावेत अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नागरे, दिनेश पाथरे, श्रीकांत आढाऊ यांच्या नेतृत्वात उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणात
लक्ष्मण ढोम, अजय आढाऊ, प्रदीप आढाऊ, हरिदास अढाऊ, पंकज भाकरे निर्मला राऊत आदींचा समावेश आहे.