शहिदावर अंत्यस्ंस्कार बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:11 IST2020-12-29T04:11:26+5:302020-12-29T04:11:26+5:30
अचलपूर व परिसरातील गावांतून नागरिक रस्त्याच्या दुतर्फा भारत मातेच्या या सुपुत्राला वंदन करण्यासाठी उपस्थित होते. ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर फलक लावण्यात ...

शहिदावर अंत्यस्ंस्कार बातमी
अचलपूर व परिसरातील गावांतून नागरिक रस्त्याच्या दुतर्फा भारत मातेच्या या सुपुत्राला वंदन करण्यासाठी उपस्थित होते. ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर फलक लावण्यात आले होते. ''भारतमाता की जय'', ''शहीद कैलास दहिकर अमर रहे'' अशा घोषणा देत पिंपळखुटा येथे हजारो नागरिक जमले होते.
कुटुंबीयांना शोक अनावर
सैन्य दलाच्या वाहनात शहीद कैलास दहिकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यावेळी कुटुंबीय व आप्तांचा शोक अनावर झाला होता. शहीद कैलासचे वडील, आई, पत्नी बबली शोकविव्हळ झाले होते. कैलास यांच्या दीड वर्षाच्या चिमुकलीने पित्याचे अंत्यदर्शन घेतले. मात्र ती प्रचंड भांबावली होती.
वीरपत्नीला तिरंगा
कैलास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पिंपळखुटा गावालगतच्या मैदानावर सरण रचण्यात आले. त्यावेळी शहीद दहीकर यांच्या पत्नी बबली दहीकर यांना सैन्यदलातर्फे सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या धाय मोकलून रडल्या. कैलास यांचे बंधू केवल यांनी शहीदाच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी राष्ट्रगीत सादर होऊन सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन केले. गावकऱ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून लाडक्या ‘फौजी’ला श्रद्धांजली वाहिली.
भूमीचा गौरव वाढवणारा वीर
कैलास दहीकर यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. भारतमातेच्या या सुपुत्राने येथील भूमीचा गौरव वाढवला आहे. दहीकर कुटुंबाची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे. आम्ही या कुटुंबाला सर्वतोपरी साहाय्य करू, असे मत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
बलिदान प्रेरणादायी
सातपुड्याच्या कुशीत वाढलेला मेळघाटच्या शूर सुपुत्राला हिमालयाच्या कुशीत वीरमरण आले. शहीद कैलास दहीकर यांचा त्याग व बलिदान सर्वांना प्रेरणा देणारे आहे, अशी भावना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. खासदार नवनीत राणा, पिंपळखुट्याचे सरपंच गजानन येवले यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.