पर्यावरण समृद्धी योजनेसाठी पावणेदोन कोटींचा निधी
By Admin | Updated: January 25, 2015 23:06 IST2015-01-25T23:06:03+5:302015-01-25T23:06:03+5:30
ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्यावतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात गावांचा विकास साधला जातो.

पर्यावरण समृद्धी योजनेसाठी पावणेदोन कोटींचा निधी
जितेंद्र दखणे - अमरावती
ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन व विकास घडवून आणण्यासाठी शासनाच्यावतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात गावांचा विकास साधला जातो. ज्या गावांनी विकासात सातत्य ठेवले आहे अशाच गावांना तीन टप्प्यात पात्र ठरविण्यात येते. जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात १३ गावे पात्र ठरली आहेत. या गावांना विकासासाठी १ कोटी ७० लाख २८ हजार रूपये लवकरच प्रदान केले जाणार आहेत.
आधुनिकीकरणामुळे शहरासह ग्रामीण भागात झपाट्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. त्यामुळे वातावरणाचा समतोल ढासळत आहे. ग्रामीण भागात पर्यावरणाचे संवर्धन, जतन, संरक्षण व्हावे. यातून समृद्ध गाव विकसित व्हावे, गावात पाणी, जमीन, हवा, वनस्पती यांचे योग्य व्यवस्थापन व्हावे, गावातील नागरिकांचे राहणीमान त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. या बाबींची पूर्तता करणाऱ्या गावांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत प्रामुख्याने गावातील रोपवाटिका व संवर्धन, स्वच्छता, सांडपाण्याचे व्यवस्थापन, जलनिस्सारण, गटारे, रस्त्यावरील दिवाबत्ती, सौर पथदिवे, अपारंपारिक ऊर्जा, विकासाचा वापर आदी कामांना प्राधान्य देण्यात आले. ही योजना तीन टप्प्यात राबविण्यात येते. पहिल्या टप्प्यातील निकष पूर्ण करणाऱ्या गावांची निवड दुसऱ्या टप्प्यात केली जाते. दुसऱ्या टप्प्यातील निकष पूर्ण करणाऱ्या गावांची निवड तिसऱ्या टप्प्यात केली जाते. निकषाचे पालन करणाऱ्या ग्रामपंचायतींना दरवर्षी निधी लोकसंख्येच्या आधारावर दिला जातो. (प्रतिनिधी)