‘डेवलपिंग’ अमरावती महापालिकेवर धनवर्षाव; नगरपालिका, नगरपंचायतींनाही आर्थिक हात
By प्रदीप भाकरे | Updated: June 14, 2023 17:31 IST2023-06-14T17:29:26+5:302023-06-14T17:31:07+5:30
५.३९ कोटींचा निधी : प्रथमच मालमत्ता सर्वेक्षण पार पडले

‘डेवलपिंग’ अमरावती महापालिकेवर धनवर्षाव; नगरपालिका, नगरपंचायतींनाही आर्थिक हात
अमरावती : ‘डेवलपिंग’ अमरावती महापालिकेवर धनवर्षाव करताना नगरविकास विभागाने पुन्हा एकदा मूलभूत अनुदानाचा दुसरा हप्ता दिला आहे. ८ जूनच्या शासन निर्णयान्वये अमरावती महापालिकेच्या वाट्याला ५ कोटी ३८ लाख ९० हजार २०५ रुपये असा घसघशीत निधी आला आहे. यापूर्वी १ जूनला १५ व्या वित्त आयोगातून महापालिकेच्या तिजोरीत ८ कोटी ८ लाख रुपये जमा झाले होते.
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या सकारात्मक पुढाकारामुळे यंदा प्रथमच मालमत्ता सर्वेक्षण पार पडले. त्याची यशस्वीता नव्या आर्थिक वर्षात दिसून येईल, तर नगररचना विभागानेदेखील मनपाच्या तिजोरीत मोठी भर पाडली. स्वउत्पन्नदेखील वाढले. १५ व्या वित्त आयोगातील निधी येईपर्यंत कोट्यवधींची देयके मनपा फंडातूनदेखील दिली गेली. विकासासाठी, कंत्राटदारांची थकबाकी देण्यासाठी आर्थिक उलाढाल करण्यात वाकबगार ठरलेल्या आयुक्तांच्या परफेक्ट नियोजनामुळे यंदा थकबाकीदारांची फारशी ओरड झाली नाही. त्यातच नगरविकास विभागानेदेखील वेळोवेळी निधी देऊन महापालिकेची संभाव्य आर्थिक कोंडी टाळली.
३० मार्च रोजीच्या शासन निर्णयाद्वारेदेखील नगरविकास विभागाने महापालिकेला ८ कोटी रुपये निधी दिला होता, तर ८ जूनच्या शासन निर्णयान्वये १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार नॉन मिलियन प्लस सिटीज अंतर्गत सन २०२२/२३ वर्षातील अबंधनकारक/मूलभूत अनुदानाचा दुसरा हप्ता म्हणून १९१ कोटी रुपये दिले गेलेत. त्यात अमरावती महापालिकेच्या वाट्याला ५.३९ कोटी रुपये आलेत.
नगरपरिषदेलाही मिळाला निधी
अचलपूर - ९२,४९,८४० रु., अंजनगाव - ४५,३०,५९७ रु., वरूड - ४४,८८,०,५१ रु., मोर्शी : ३३,४९,५७१ रु., दर्यापूर : २९,७५,१०६ रु., चांदूररेल्वे : १६,२०,२७० रु., चांदूरबाजार :१५,२७,१८६ रु., धामणगाव रेल्वे : १७,३७,५५३ रु., शेंदूरजना २१,५७,०४३, चिखलदरा : ४,९७,१०० रु., धारणी : १४,४४,१९४ रु., तिवसा : २५,५३,९४२ रु., भातकुली :१३,३१,६५५ रु. व नांदगाव खंडेश्वर : १८,४४,७२७ रु.