दिवाळीनंतर होणारी पायाभूत संकलित चाचणी रद्द
By Admin | Updated: December 16, 2015 00:14 IST2015-12-16T00:14:15+5:302015-12-16T00:14:15+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांतून घेतली जाणारी पायाभूत संकलित चाचणी परीक्षा १ ऐनवेळी रद्द करण्यात आली.

दिवाळीनंतर होणारी पायाभूत संकलित चाचणी रद्द
शाळास्तरावर घेण्याचे निर्देश : निकाल लागणार उशिरा
अमरावती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांतून घेतली जाणारी पायाभूत संकलित चाचणी परीक्षा १ ऐनवेळी रद्द करण्यात आली. याआधी आॅक्टोबर २०१५ मध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र नियोजन फिस्कटल्यान दिवाळीनंतरचा मुहूर्त ठरविण्यात आला. तथापि हा मुहूर्तसुद्धा कायमचा चुकला असून राज्यस्तरावरून ही परीक्षा आता घेण्यात येणार नाही, अशी सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी केली आहे. या निर्णयामुळे सहामाहीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आॅक्टोबरमध्ये प्रस्तावित असलेली संकलित मूल्यमापन - १ ही चाचणी दिवाळीनंतर घेण्यात येईल, असे कळविण्यात आले होते. असे असले तरी आता राज्यस्तरावरून ही चाचणी घेण्यात येणार नाही किंवा या परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नोत्तर पत्रिका किंवा मास्टर कॉपी पुरविण्यात येणार नाही, असे संचालकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या शाळांनी विद्या परिषदेच्या निर्देशामुळे प्रथम भाषा व गणित या विषयाची संकलित मूल्यमापन - १ ही चाचणी घेतली नसेल त्यांनी त्यांच्या सोईनुसार ही चाचणी शाळास्तरावर घ्यावी. आता राज्यस्तरावरून यंदा तीनऐवजी २ चाचण्या घेण्यात येईल, असे परिषदेने म्हटले आहे. त्याचवेळी संकलित मूल्यमापन - २ ही चाचणी शासन निर्णयानुसारच होणार आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रथम भाषा व गणित या विषयांची पायाभूत चाचणी जुलै २०१५ मध्ये घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले. परंतु पायाभूत चाचणीच्या प्रश्नोत्तर पत्रिका राज्य स्तरावरून पुरविण्याच्या कालावधीत तांत्रिक घोळ झाल्याने पायाभूत चाचणी सप्टेंबर,आॅक्टोबरमध्ये घेण्यात आली. अनेक ठिकाणी पायाभूत चाचणीत गैरप्रकारही झाले. संकलित मूल्यमापन - २ साठी प्रश्नपत्रिका संचच वेळेत बनणे आणि पुरवणे शक्य नसल्याने ही परीक्षाच रद्द करण्याचा मध्यम मार्ग शिक्षण विभागाने निवडल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)