सर्वशिक्षा अभियानाला निधीचा वानवा, उपक्रमात आडकाठी
By Admin | Updated: July 20, 2015 00:17 IST2015-07-20T00:17:12+5:302015-07-20T00:17:12+5:30
ग्रामीण व शहरी भागातील सर्व बालकांपर्यंत गुणवत्तापूर्वक शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राज्य शासनाने सर्वशिक्षा अभियान राबविणे सुरू केले आहे.

सर्वशिक्षा अभियानाला निधीचा वानवा, उपक्रमात आडकाठी
प्रतीक्षा : शासनाकडून अनुदान उपलब्ध नाही
अमरावती : ग्रामीण व शहरी भागातील सर्व बालकांपर्यंत गुणवत्तापूर्वक शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राज्य शासनाने सर्वशिक्षा अभियान राबविणे सुरू केले आहे. मात्र यावर्षी सर्वशिक्षा अभियानाला अद्यापपर्यंतही जिल्हास्तरावर निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी यामधून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमात अडचणी येत आहेत.
सर्वशिक्षा अभियानाचे नियोजन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत केले जाते. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत सर्वशिक्षा अभियानाचा आराखडा तयार करून पाठविला जातो. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा परिषद राज्य शासनाकडे पाठविते. राज्याच्या एकत्रित अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी व त्यानंतर केंद्र शासन प्राप्त प्रस्तावावर अंतिम निर्णय घेऊन मंजुरी प्रदान करते. त्यानंतर साधारणत: दोन टप्प्यांत सर्वशिक्षा अभियानाचा निधी वितरित केला जातो. एप्रिल महिन्यात पहिला हप्ता तर सप्टेंबर ते मार्च या कालावधीत दुसरा हप्ता दिला जातो, आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला दरवर्षी जिल्हास्तरावरील सर्व शिक्षण विभागाकडे निधी उपलब्ध होतो. मात्र यंदा अद्यापपर्यंतही जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान विभागाने सन २०१५़/१६ साठी मागणी केलेल्या सुमारे ६० कोटींच्या निधीपैकी केवळ जिल्हा परिषद आणि महापालिका मिळून सुमारे ३५ कोटी रूपये शासनाने मंजूर केले आहेत. यापैकी सद्यस्थितीत कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही. अशातच दरवर्षी अभियानात विविध उपक्रमांसाठी मागणी केलेल्या निधीत कपात होत असल्याने नाईलाजास्तव उपक्रमांना कात्री लावावी लागत आहे. यंदाच्या सत्रात जिल्ह्याला उपक्रमापुरता निधी मिळत आहे. यामधून शालेय गणवेश वाटप, पाठ्य पुस्तके, शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करणे यावर उपक्रमनिहाय निधी उपलब्ध आहे. मात्र सर्वशिक्षा अभियानाकरिता अद्यापपर्यंत निधी उपलब्ध झाला नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)