रमाई घरकूल योजनेसाठी महापालिकेत निधीची वानवा
By Admin | Updated: November 17, 2015 00:23 IST2015-11-17T00:23:15+5:302015-11-17T00:23:15+5:30
रमाई घरकूल योजनेसाठी निधीची वानवा असून महापालिकेने शासनाकडे २० कोटी रुपये अनुदान मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे.

रमाई घरकूल योजनेसाठी महापालिकेत निधीची वानवा
हजारो लाभार्थ्यांचे प्रस्ताव : शासनाक डे २० कोटींची मागणी
अमरावती : रमाई घरकूल योजनेसाठी निधीची वानवा असून महापालिकेने शासनाकडे २० कोटी रुपये अनुदान मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र घरकुलाचे अनुदान मिळावे, यासाठी लाभार्थ्यांचे हजारो प्रस्ताव पडून आहेत. तर दुसरीकडे समाज कल्याण विभागाने जुने अनुदान खर्च झाल्याशिवाय नवीन अनुदान मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
नवबौद्ध व अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळत आहे. राज्य शासनाने ही योजना लागू करताना पहिल्या टप्प्यात विधवा, घटस्फोटीत महिलांना प्राधान्य दिले आहे. दोन लाख रुपयातून घरकूल साकारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र लाभार्थी हे नवबौद्ध, अनुसूचित जाती समुहासोबत बीपीएल यादीत असणे अनिवार्य आहे. या अटी, शर्थी पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच रमाई आवास योजनेचा लाभ दिल्या जात आहे. मात्र काही महिन्यांपासून निधी उपलब्ध नसल्यामुळे घरकूल लाभाचे प्रस्ताव येऊनही ते निधीमुळे मंजूर करता येत नाही, अशी माहिती आहे. प्राप्त प्रस्तावातून ४५० लाभार्थ्यांची यादी योग्यरित्या तपासून ती मंजुरीसाठी तयार आहे. या यादीला बैठकीत मान्यता मिळाली की, संबंधित लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले जाणार आहे. यापूर्वी २१०० लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान देण्यात आले आहे. नव्याने १८५० घरकुलांचे प्रस्ताव वजा अर्ज महापालिकेत दाखल आहेत. अनुक्रमानुसार लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याचे धोरण आहे. ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्र व्यवस्थित आहे, अशांना प्राधान्यक्रम दिले जाणार आहे. निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांना अनुदान देऊन घरकुलाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. घरकूल लाभासाठी नवीन यंत्रणा नेमण्यात आली आहे. या यंत्रणेमार्फत घरकूल संदर्भात जागेची चाचपणी, कागदपत्र गोळा केली जात आहे. मात्र नवीन यंत्रणेमुळे घरकूल योजनेच्या कामाला खिळ बसल्याचा आरोप बहुतांश सदस्यांचा आहे. (प्रतिनिधी)
अकोला महापालिके तून आठ कोटी अप्राप्त
रमाई घरकूल योजनच्या अंमलबजावणीसाठी शासनाने अकोला महापालिकेला दिलेले आठ कोटी रुपये अखर्चिक आहेत. त्यामुळे हे आठ कोटी रुपये अनुदान अकोला महापालिकेने अमरावतीला वळती करावे, असे पत्र समाज कल्याण विभागाने अकोला महापालिकेला दिले आहे. मात्र अद्यापपर्यंत ही रक्कम अमरावती महापालिकेला मिळाली नसल्याची माहिती आहे. नवीन घरकुलांच्या प्रस्तावानुसार शासनाक डे २० कोटी रुपयांची मागणी महापालिकेने केली आहे.
महापालिकेला आतापर्यंत ४० कोटी मिळाले
घरकूल योजनेसाठी समाज कल्याण विभागाने अमरावती महापालिकेला आतापर्यंत ४० कोेटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यापैकी स्थानिक दस्तूरनगर शाखेतील देना बँकेच्या शाखेत ७ कोटी, ३६ लाख, ७८२ रुपये शिल्लक आहे. समाज कल्याण विभागाकडून उपयोगिता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय नवीन अनुदान मिळणार नाही. तर दुसरीकडे रमाई घरकूल योजनेसाठी बँकेत अनुदान शिल्लक असताना ते जमा कशासाठी ठेवले जाते, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.
घरकुलाचे आॅनलाईन १८५० अर्ज सादर झाले आहेत. त्यापैकी ४५० अर्जांची छाननी झाली आहे. अनुक्रमे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. निधी उपलब्ध असून मंजूर समितीची बैठक होताच प्रश्न मार्गी लागेल.
- रवींद्र पवार, उपअभियंता,
दलित वस्ती सुधार विभाग.