एटीसी कार्यालयाचे कामकाज रेंगाळले
By Admin | Updated: June 3, 2015 23:58 IST2015-06-03T23:58:05+5:302015-06-03T23:58:05+5:30
येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तपदाचा तिढा कायम आहे.

एटीसी कार्यालयाचे कामकाज रेंगाळले
कधी तू, कधी मी : अधिकारी पदाचा तिढा कायम
अमरावती : येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तपदाचा तिढा कायम आहे. अप्पर आयुक्त म्हणून अशोक आत्राम की महादेव राघोर्ते यापैकी कोणी कामकाज कोणी हाताळावे, हे अद्यापही शासनाने निश्चित केले नाही. परंतु सोयीनुसार ‘कधी तू, कधी मी’ असा स्वाक्षरी करण्याचा शिरस्ता सुरु असल्याने एकुणच कामकाज रेंगाळल्याची स्थिती आहे.
शासनाने आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तपदावरुन अशोक आत्राम यांची उचबांगडी केली. शासन निर्णयाविरुद्ध आत्राम हे प्रशासकीय लवादात गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून आत्राम यांनी बदलीच्या निर्णयाविरुद्ध ‘स्टेटस्- को’ मिळविला. या संदर्भात १० जून ही न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. दरम्यान आत्राम यांच्या बदलीचे आदेश शासनाने पाठवून त्यांचा कारभार उपायुक्त महादेव राघोर्ते यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. एकतर्फा पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया शासन निर्णयानुसार पार पाडून राघोर्ते यांच्या कार्यवाहीची माहिती शासनाला कळविण्यात आली. परंतु गत आठवड्यात आदिवासी अप्पर आयुक्त (एटीसी) पदावरुन सुरुझालेले वादळ शमण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. अशोक आत्राम यांनी प्रशासक ीय लवादात धाव घेतल्याने अप्पर आयुक्त पदाची सुत्रे कोणी हाताळावी हा निर्णय घेणे शासनाला कठीण झाले आहे. आत्राम यांच्या बदलीला ‘स्टेटस्- को’ देताना न्यायालयाने आदेशात काय म्हटले याची चाचपणी करण्यासाठी या आदेशाची प्रत आदिवासी विकास विभागाच्या सचिवांनी मंगळवारी न्यायालयातून मागविली असल्याची माहिती आहे. विधी व न्याय मंत्रालयात यासंदर्भात निर्णयासाठी हा आदेश पाठविण्यात आला आहे. परंतु बुधवारी उशिरापर्यत अप्पर आयुक्त पदाची सुत्र कोणाकडे हा निर्णय झाला नाही, हे विशेष. तर दुसरीकडे अशोक आत्राम आणि महादेव राघोर्ते हे दोन्ही अधिकारी एटीसी म्हणून सोयीनुसार फाईलींवर स्वाक्षरी करीत असल्याची माहिती आहे. नेमके अप्पर आयुक्त कोण? हे गुलदस्त्यात असताना काही मलईदार फाईलींवर स्वाक्षरी करण्यात आल्या तर या बाबीला जबाबदार कोण राहिल, हा महत्त्वाच्या प्रश्न कायम आहे. निविदा प्रक्रिया, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, साहित्य खरेदी आदी महत्त्वाचे कामकाज कधी सुरळीत होणार हा सवाल निरुत्तरीत आहे. आदिवासी समाजाला न्याय आणि विकास करता यावा, स्थापन केलेले अप्पर आयुक्त कार्यालयात भष्ट्राचार गाजत असल्याचा इतिहास आहे.
दोन अधिकाऱ्यांच्या अधिकाराने कर्मचारी हैराण
आदिवासी विकास विभागात अप्पर आयुक्तपदी दोन अधिकारी कायम आहेत. त्यामुळे फाईलीवर स्वाक्षरी कोणाची घ्यावी, या बुचकळ्यात कर्मचारी आहेत. आत्राम किंवा राघोर्ते हे दोघेही अप्पर आयुक्त म्हणून रुबाब दाखवित असल्याने या कार्यालयातील कर्मचारी हैराण झाले आहेत. एक खुर्ची अन् दोन अधिकारी? असा एटीसी कार्यालयाचा कारभार सुरु आहे. यात सर्वाधिक अडचण ही कर्मचाऱ्यांची होत असल्याचे दिसून येत आहे.