मृगाचा बेडूक तारणार
By Admin | Updated: May 22, 2016 00:05 IST2016-05-22T00:05:49+5:302016-05-22T00:05:49+5:30
पावसाचा अंदाज नेहमीच पंचागकर्ते ठरवितात़ याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून आपल्या शेतीची पेरणी करते़...

मृगाचा बेडूक तारणार
पंचांग कर्त्यांचा अंदाज : जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस
मोहन राऊत अमरावती
पावसाचा अंदाज नेहमीच पंचागकर्ते ठरवितात़ याच अंदाजावर शेतकरी नेहमी विश्वास ठेवून आपल्या शेतीची पेरणी करते़ खरीप हंगामात या नक्षत्रात असलेले वाहन शेतकऱ्यांच्या जीवनात सुख दु:खाचे चक्रव्यूह सुरू ठेवते. यंदा मृग नक्षत्र बेडूक या वाहनापासून तर चित्राच्या गाढव या वाहनापर्यंत समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज पंचागकर्त्यांनी व्यक्त केल्याने भरघोस उत्पन्नाची शेतकऱ्यांची आशा पल्लवीत झाली आहे़
तीन वर्षांत अनेकदा पावसाने खरीप हंगामात पावसाने दगा दिला आहे़ कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार याविषयी पंचागकर्त्यांनी अनेकदा अंदाज मांडले. शेतकऱ्यांनी याप्रमाणे शेतीत पेरणी केली़ यापूर्वीच्या हंगामात अनेक वेळा पावसाने दगा दिला़
शेतकऱ्यांमध्ये उत्साह
अमरावती : यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकरी आतापासूनच बी-बियाणे, खते जमा करण्याच्या तयारीला लागला आहे़
जिल्ह्यात सर्वाधिक खरीप हंगामात पेरणी होत असून शेतकऱ्यांची मदार या हंगामावर असते़
मृगाच्या पावसापासून हवामान खात्याचे अंदाज खरे ठरले, तर यंदा अधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे़ यासाठी शेतकऱ्यांनी तयारी चालविली आहे़ कृषिकेंद्र संचालकांकडून दरवर्षी शेतकऱ्यांची फसवणूक होते़ शेतकऱ्यांनी मागणी केलेले बियाणे न देता अधिक उत्पन्न होणार असल्याचे भासवून बनावट बियाणे दिल्याचा प्रकार यापूर्वी जिल्ह्यात उघडकीस आला आहे़ दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवूनही या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे़ त्यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन बनावट बियाणे तसेच होणारा काळाबाजार थांबविणे महत्त्वाचे आहे़, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)