ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:13 IST2021-02-12T04:13:30+5:302021-02-12T04:13:30+5:30

अमरावती: कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध टाकून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे काढून त्याआधारे ब्लॅकमेल करून आरोपीने दोनदा लैंगिक अत्याचार केल्याची ...

Frequent abuse of a minor girl by blackmail | ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

अमरावती: कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध टाकून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे काढून त्याआधारे ब्लॅकमेल करून आरोपीने दोनदा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सहा महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन आरोपीविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला. महिला व पुरुष आरोपीला न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी मुलीवर अत्याचार झाला. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. ३५ वर्षीय मावसबहिणीशी तिचा जुना वाद होता. ही मावसबहीण व ४० वर्षीय पुरुष आरोपी लेडीज गारमेंटचा व्यवसाय करतात. घरीच हा किरकोळ व्यवसाय असल्याने सहा महिन्यांपूर्वी तिने मुलीला कामानिमित्त घरी बोलावले. वादाचा वचपा काढण्यासाठी कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून मुलीला बेशुद्ध केले. ती शुद्धीवर नसताना नको त्या अवस्थेतील छायाचित्रे काढण्यात आली. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिला ती अश्लील छायाचित्रे दाखविण्यात आली व ती व्हायरल करण्याची धमकी देऊन पुरुष आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आणखी एकदा तिला ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झाले. मुलीने अनेक दिवस दडविलेली ही घटना नातेवाइकांपुढे उघड केल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. मंगळवारी गुन्हा नोंदविल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पुढील तपास फ्रेजरपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक करीत आहेत. आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७६, सहकलम ३,४, बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

बॉक्स:

दोघांचेही मोबाईल जप्त

आरोपीला अटक केल्यानंतर पुरुष व महिला आरोपीचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले. सदर मोबाईलमध्ये मुलीची अश्लील छायाचित्रे आहेत की डिलीट केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. पीडिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Frequent abuse of a minor girl by blackmail