‘स्मार्ट व्हिलेज’च्या पारितोषिकाचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: June 5, 2017 00:08 IST2017-06-05T00:08:08+5:302017-06-05T00:08:08+5:30
स्मार्ट ग्राम योजनेच्या तालुका आणि जिल्हास्तरीय बक्षीस वितरणासाठी शासनाकडून निधीच प्राप्त न झाल्यामुळे ...

‘स्मार्ट व्हिलेज’च्या पारितोषिकाचा मार्ग मोकळा
निधी मिळाला : ग्रामपंचायतींची प्रतीक्षा संपली
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्मार्ट ग्राम योजनेच्या तालुका आणि जिल्हास्तरीय बक्षीस वितरणासाठी शासनाकडून निधीच प्राप्त न झाल्यामुळे पारितोषिक वितरणाच्या मुहूर्ताच्या दिवशी म्हणजे १ मे या महाराष्ट्रदिनी केवळ प्रमाणपत्र वितरित करून वेळ निभावून नेली होती. मात्र आता तब्बल महिनाभराने शासनाकडून पारितोषिकाची रक्कम जिल्हा परिषदेला उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रमाणपत्र देऊनच स्मार्ट व्हिलेजच्या पदाधिकाऱ्यांनी बोळवण करण्यात आल्यानंतर आता पारितोषिकांची रक्कम वितरित करून समाधान केले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. स्मार्ट व्हिलेजसाठी राज्यात १०४ कोटींची गरज असताना त्यातील केवळ १० कोटी ५६ लाख रुपयेच शासनाने दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींवर केवळ प्रमाणपत्रावर समाधान मानण्याचा प्रसंग १ मे रोजी जिल्ह्यातील स्मार्टग्राम असलेल्या ग्रामपंचायतींवर ओढवला होता.
स्मार्ट ग्राम २२योजनेची सुरूवात डिसेंबर २०१६ पासून झाली. त्यासाठी योजनेच्या निकषानुसार तालुका स्तरावर समितीने तपासणीआधीच केली. त्यासमितीच्या अहवालावरून निवड झालेल्या ग्रामपंचायतींना २५ टक्के गुणांकन करण्यात आले. प्रसिद्धीनंतर कोणाचाही आक्षेप न आल्याने तालुकास्तरावर प्रथम गावांची निवड करण्यात आली. त्यागावांना प्रजाकसत्ताकदिनी पारितोषिक वितरण करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे हा मुहूर्त लांबणीवर पडला होता. त्यानंतर जिल्हास्तरीय गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच १ मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पारितोषिक वितरणासाठीचा मुहूर्त साधला गेला. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना धनादेशासह प्रमाणपत्र वितरणाचे शासनाने आधीच सुचविले होते. मात्र, त्यासाठी निधीच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे प्रमाणपत्र देऊन या गावांचे समाधान करण्यात आले होते. आता तब्बल महिनाभरानंतर या गावांसाठी शासनाने पारितोषिकाची रक्कम वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे लवकरच या गावांना एका कार्यक्रमात पारितोषिकाची रक्कम सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र यासाठी अद्याप तरी मुहूर्त काढण्यात आलेला नाही.