५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष
By Admin | Updated: April 11, 2015 00:10 IST2015-04-11T00:10:53+5:302015-04-11T00:10:53+5:30
उन्हाळ्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता..

५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष
निर्देश : आरोग्य समितीच्या बैठकीत निर्णय
अमरावती : उन्हाळ्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य समितीच्या सभेत जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती सतीश हाडोळे यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
वाढते तापमान व कडक उन्हामुळे उष्माघातासोबतच काही साथजन्य आजारसुद्धा फैलावण्याची शक्यता आहे. शहरी भागात रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळू शकते. मात्र ग्रामीण भागात तसे नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी आतापर्यंत विशेष सुविधा नव्हती. औषधींचा पुरवठा नियमित होत असला तरी विशेष व्यवस्थेअभावी अनेकदा रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येते ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे.
सामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होते. अशा वेळी गावातील लोक मिळेल तेथून पाणी पिण्यासाठी वापरतात.
या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना लेखी पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
पाणी स्रोत नियंत्रणासाठी खबरदारीच्या सूचना
ग्रामीण भागात पिण्याचे पाण्याचे स्त्रोत, पाणी टंचाईमुळे काही ठिकाणी दूषित होतात. अशावेळी पर्याय म्हणून मिळेल तेथून पाणी आणून तहान भागविली जाते, हा प्रकार बहुधा मेळघाटात होतो. परंतु मेळघाटसह इतरही ग्रामपंचायतींना दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी आरोग्य सभापतींनी सर्व ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.
अशा आहेत सुविधा
जिल्हा परिषदेच्या ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालय येथे असलेल्या रूग्णांच्या वॉर्डमध्ये उष्माघाताच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी या विशेष कक्षात रूग्णासाठी वाताणुकुलीत व्यवस्थेसाठी कुलर, पंखा या साधनाच्या माध्यमातून रूग्णांना थंड वातावरण मिळावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पुरेसा औषध साठा, सलाईन व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
मागाील वर्षी रूग्ण दाखल रुग्णांची संख्या ११
दरवर्षी एप्रिल ते जून महिन्यात उन्हाचा पारा जास्त असतो. त्यामुळे या कालावधीत उष्माघाताचे रूग्ण आढळून येतात. मागील वर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ११ रूग्ण मे महिन्यात दाखल झाले होते. यापैकी तिघांचा मृत्यू झाला. यंदा जिल्ह्यातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयात विशेष कक्ष सुरू केले आहेत. सध्या उष्माघाताचा रूग्ण उपचारासाठी दाखल झाला नाही.
सध्या उन्हाचा पारा झपाट्याने वाढत चालला आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे रुग्ण याा दिवसांत आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. मात्र त्यांची पुरेशी व्यवस्था ग्रामीण भागात होत नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रात विशेष कक्ष सुरू करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी व्यवस्था करीत आहेत.
- सतीश हाडोळे
आरोग्य सभापती, जि. प. अमरावती.
ग्रामीण भागात मजूर वर्ग उन्हाळयात वाढत्या तापमानात कामे करतात. इतरही नागरिक उन्हाळ्याच्या दिवसांत काही कामामित्त बाहेर पडतात. मात्र या दिवसांत सुती कपडे, कानाला दुप्पटा, गॉगल्स लावूनच बाहेर पडावे. भरपूर पाणी, निंबू शरबत सेवन करावे व उन्हापासून शक्यतो बचाव करण्याचा प्रयत्न करावा.
- संतोष माने
अतिरिक्त डीएचओ.