कुलगुरू निवासस्थान परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; मनुष्यहानीची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 05:00 IST2020-11-10T05:00:00+5:302020-11-10T05:00:02+5:30
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी बिबट्याचा मुक्त संचार असल्याबाबत दखल घेतली आहे. दिवाळीनंतर विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यापीठात प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांची वर्दळ वाढेल. अशातच बिबट दररोज शिकार शोधण्यासाठी विद्यापीठ परिसर पिंजून काढत आहे.

कुलगुरू निवासस्थान परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; मनुष्यहानीची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पूर्वेकडील भागात बिबट जोडप्यांचा मुक्त संचार आहे. गत आठवड्यात कुलगुरू बंगल्याच्या मागील बाजूस नाल्यात बिबट तृष्णा भागविताना दिसून आला. त्याने कुलगुरू बंगला परिसरात श्वानाची शिकार केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने वनविभागाला ट्रॅप कॅमेरे लावण्यासाठी व वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी बिबट्याचा मुक्त संचार असल्याबाबत दखल घेतली आहे. दिवाळीनंतर विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यापीठात प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांची वर्दळ वाढेल. अशातच बिबट दररोज शिकार शोधण्यासाठी विद्यापीठ परिसर पिंजून काढत आहे. कुत्रे, माकड हे बिबट्याचे आवडते खाद्य असून, ते विद्यापीठात सहजतेने उपलब्ध होत आहेत. बिबट्याचे जोडपे अन् दोन बछडे सुरक्षा रक्षकांनी अनेकदा बघितले. मनुष्यहानी होऊ नये , यासाठी खबरदारी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने वनविभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार चालविला आहे.
सुरक्षा रक्षकांनी अनेकदा बिबटे बघितले. गत आठवड्यात कुलगुरू बंगल्याच्या मागील बाजूस नाल्यातही दिसून आला. त्यांचा मुक्त संचार आहे. वनविभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- रवींद्र सयाम, प्रमुख, सुरक्षा विभाग.
विद्यापीठ परिसरात बिबट असला तरी त्याला जेरबंद करता येत नाही. वन्यजीव अधिनियमानुसार कार्यवाही होईल. मागणीनुसार पाच ट्रॅप कॅमेरे, कर्मचारी गस्त वाढविली जाणार आहे.
- कैलास भुंबर, आरएफओ, वडाळी.