मोफत धान्य योजना शनिवारपर्यंतच ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:29+5:302020-12-11T04:38:29+5:30
अमरावती : लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. रोजगार ...

मोफत धान्य योजना शनिवारपर्यंतच ?
अमरावती : लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. रोजगार हिरावल्याने गरिबांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, याकरिता एप्रिलमध्ये सुरू केलेल्या या योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतही आता संपल्याने व मुदतवाढीबाबत कुठलेही आदेश नसल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे धान्य वाटपाच्या योजनेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
लॉकडाऊन काळात कष्टकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. हाताला कामे नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. या संकटातून बाहेर काढण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना प्रती सदस्य पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. कोरोना संकट कायम राहिल्याने जुलैत पंतप्रधानांनी ही योजना आणखी पाच महिन्यांसाठी वाढविली. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचे मोफत धान्य १२ डिसेंबरपर्यंत वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त झाले नाहीत.
कोट
शासनाने कोरोना संकटकाळात नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्यपुरवठ्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मोफत धान्य वाटपाची कार्यवाही १२ डिसेंबरपर्यंत होईल. यानंतर पुढे मोफत धान्य देण्याबाबत शासनाचे निर्देश नाहीत. शासनाच्या सूचनेनुसार पुढे कारवाई केली जाईल.
- अनिल टाकसाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी