विद्यापीठात बिबट्याच्या बछड्यांंचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST2021-05-05T04:20:35+5:302021-05-05T04:20:35+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, सोमवारी पहाटे ६ वाजता दोन बछडे मस्तपणे खेळताना ...

विद्यापीठात बिबट्याच्या बछड्यांंचा मुक्त संचार
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, सोमवारी पहाटे ६ वाजता दोन बछडे मस्तपणे खेळताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे विद्यापीठ परिसरात या दोन बछड्यांसह बिबट्याच्या जोडप्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुलगुरूंच्या बंगल्यापासून पुढे वनक्षेत्र सुरू होते. काही दिवसांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाने बिबट, रानडुक्कर, हरिण, नीलगाय आदी वन्यजिवांचा मुक्त संचार असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घड नये, यासाठी काही क्षेत्रांना जाळीचे संरक्षण कुंपण घातले आहे. ज्या भागातून बिबट्याचा संचार होत असल्याचा संशय आहे, त्याच भागात तारांच्या जाळीचे कुंपण घालण्यात आले आहे. कुलगुरू बंगल्यानंतर रसायनशास्त्र विभाग, शारीरिक शिक्षण विभाग, जेआरएफ होस्टेल आदी भाग वनक्षेत्रालगत आहे. हल्ली विद्यापीठाच्या तलावात पाणीसाठा नाही. त्यामुळे वन्यजीव, पशूंना तृष्णा भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी नैसर्गिक स्रोत आहेत. त्याच भागात बिबट व अन्य वन्यजिवांचे वास्तव आहे. सोमवारी मादी बिबट पाणी वा शिकारीच्या शोधात गेले असता, तिचे दोन बछडे बाहेरील भागात आले. ते संरक्षण कुंपणाच्या पलीकडे मुक्त संचार करीत असताना, कर्तव्यावरील पवन राऊत नामक सुरक्षा रक्षकाने त्यांचे खेळणे, बाळगणे मोबाईलमध्ये कैद केले. हल्ली विद्यापीठात शिकवणी बंद असल्याने गर्दी नाही. मात्र, अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे बिबट्यापासून मनुष्यहानीचा धोका कायम असल्याचे चित्र आहे.
-----------------
कुलसचिवांचे पुन्हा मुख्य वनसंरक्षकांना पत्र
विद्यापीठ परिसरात दोन बछडे आढळून आल्याने बिबट्याच्या जोडप्याचा वावर असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. वनविभागाने बिबट्यासह बछड्यांना राखीव वनक्षेत्रात सुरक्षितपणे हलवावे, अशा मागणीचे पत्र कुलसचिव तुषार देशमुख यांनी मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या नावे सोमवारी पाठविले.
---------------------------
बिबट्यापासून सावधगिरीचे पोस्टर
विद्यापीठ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे महत्त्वाच्या स्थळी ‘बिबट्यापासून सावधान’ असे फलक ठळकपणे झळकत आहेत. ज्या भागात बिबट आढळून येतो, त्या भागात ये-जा करण्यास मनाई आहे. जलरतण तलाव, तलाव परिसर, क्रीडांगण, क्रिकेटचे मैदान, जेआरएफ होस्टेल आदी भागात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.