वडाळीच्या नर्सरीत मादी बिबट्याचा पिलासह मुक्तसंचार
By Admin | Updated: September 8, 2014 00:56 IST2014-09-08T00:56:44+5:302014-09-08T00:56:44+5:30
वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयालगतच्या नर्सरीत मादी बिबट्याचा पिलासह मुक्तसंचार आढळल्याने पुन्हा वनविभागात खळबळ उडाली आहे.

वडाळीच्या नर्सरीत मादी बिबट्याचा पिलासह मुक्तसंचार
अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयालगतच्या नर्सरीत मादी बिबट्याचा पिलासह मुक्तसंचार आढळल्याने पुन्हा वनविभागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे वनविभाग कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्यासोबतच नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयाजवळील पिंजऱ्यामध्ये चंद्रपूर येथील दोन नरभक्षक बिबट बंदिस्त आहेत. या बिबट्याच्या गंधामुळे जंगलातील मादी बिबट काही वर्षांपासून आकर्षित होत आहे. त्यामुळे अनेकदा वडाळीतील नर्सरीमध्ये बिबट मुक्तसंचार करताना वनविभागातील कर्मचाऱ्यांना आढळून आला आहे. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यावृत्ताची दखल घेत वनविभागाने उपाययोजना करण्याकरिता वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यावेळी वनविभागाने त्या मादी बिबट्याचा मागोवा घेतला होता. त्याकरिता पिंजऱ्याजवळच टॅ्रप कॅमेरा लावून मादी बिबट कॅमेऱ्यात टिपले होते. रात्रीच्या सुमारास जंगलातील मादी बिबट पिंजऱ्याभोवती घिरट्या घालत पिंजऱ्याच्या आतील बिबट्याच्या मिलनासाठी प्रयत्न करीत होती.
ही बाब वनकर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडली. त्याकरिता आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जंगलात प्रवेशबंदी करण्यात आली होती. तसेच बिबट्यापासून सावधान, असे फलक वनविभागाकडून लावण्यात आले होते. मात्र काही दिवसांनंतर त्या मादी बिबट्याने वडाळी परिसर सोडला होता.
त्यानंतर काही महिने पुन्हा ती मादी बिबट दिसली नव्हती. मात्र अधून-मधून वन कर्मचाऱ्यांना बिबट दृष्टीस पडतच होते. आता मात्र पुन्हा बिबट्यासोबत तिचे पिल्लु वडाळीच्या नर्सरीमध्ये फिरताना आढळले. त्यामुळे वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयाजवळील परिसरात वनविभागाने पुन्हा गस्त वाढविली आहे. (प्रतिनिधी)