बहुराष्ट्रीय सक्षमीकरणाच्या नावाने बेरोजगारांची फसवणूक
By Admin | Updated: October 8, 2015 00:04 IST2015-10-08T00:04:30+5:302015-10-08T00:04:30+5:30
‘बहुराष्ट्रीय सक्षमीकरण’ या गोंडस नावाखाली अशासकीय योजनांचे अनुदान बायोमॅट्रीक पध्दतीने थेट लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी समन्वयकपदी नियुक्ती करुन ...

बहुराष्ट्रीय सक्षमीकरणाच्या नावाने बेरोजगारांची फसवणूक
नियुक्तीसाठी अर्ज : ग्रामसमन्वयक पदासाठी प्रती व्यक्ती उकळले सहा हजार रुपये
गणेश वासनिक अमरावती
‘बहुराष्ट्रीय सक्षमीकरण’ या गोंडस नावाखाली अशासकीय योजनांचे अनुदान बायोमॅट्रीक पध्दतीने थेट लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी समन्वयकपदी नियुक्ती करुन बेरोजगारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत ३९ बेरोजगार युवकांची फसवणूक झाली असून त्यांच्याकडून प्रत्येकी सहा हजार रूपये उकळण्यात आले आहेत. याबाबत प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे वास्तव आहे.
अशासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक आणि ग्राम समन्वयक अशी पदभरती प्रक्रिया २६ सप्टेंबर रोजी राबविण्यात आली. त्याकरिता वृत्तपत्रात जाहिरात देऊन बेरोजगार युवकांना आकर्षित करण्यात आले. ‘फायनान्शिअल इंक्ल्युशिअयन नेटवर्क अॅन्ड आॅपरेशन’ (फिनो) नामक वेबसाईटद्वारे हे कामकाज सुरू असल्याचा देखावा रंगविण्यात आला. अर्ज स्वीकारणे, नियुक्ती, मुलाखती हे सर्व सोपस्कार आटोपण्यासाठी तपोवन मार्गावर ‘स्वास्थम्’ या इमारतीत कार्यालय देखील उघडण्यात आले. बंद दवाखान्यात बेरोजगारांना लुबाडण्याचे कटकारस्थान जयंत सोळंके यांच्या माध्यमातून रचण्यात आल्याचे स्पष्ट होते.