अमरावती : शेतकरी आर्थिकरीत्या बळकट व्हावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाने फळपीक लागवडीसाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे शिवारात निशिगंधा मोगऱ्यासह गुलाबाचा सुगंध दरवळण्यास मदत होणार आहे.
एका वर्षाकरिता प्रतिहेक्टर दोन लाख रुपयांचे अनुदान देय राहणार आहे. फुलपिके लागवडीचा कालावधी १ जून ते ३० नोव्हेंबरपर्यंत राहील. या महत्त्वकांक्षी निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. अनेक वर्षापासून रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड केली जात आहे. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून फूल लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. याची राज्य शासनाने दखल घेतली असून या योजनेतून निशिगंधा, मोगरा गुलाबांची लागवड करून फुलशेती केली जाणार आहे. संचालक फलोद्यान यांच्यामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर विभागाकडून या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याकरिता क्षेत्रीय स्तरावर कारवाईची सूचना दिली आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी लाभार्थींची निवड क्षेत्रीय स्तरावर करावी. फुलपीक लागवड कार्यक्रमामुळे वैयक्तिक लाभार्थ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. मग्रारोहयोसाठी जॉब कार्डवरील प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. याकरिता लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.
बॉक्स
ग्रामसभेची घ्यावी लागणार मंजुरी
फुल पिकाच्या लागवडीसाठी ग्रामपंचायत ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे. लाभार्थी निवडीची कारवाई दरवर्षी एप्रिलअखेर पूर्ण करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करावी लागणार आहे. कामाचे नियोजन करताना कृषी व संलग्न कामे ६० टक्के घेतले जातील. याची दक्षता घ्यावी लागणार आहे. एका वर्षाकरिता प्रति हेक्टरी दोन लाख रुपये एवढे अनुदान देय राहील. फुलबाग लागवडीसाठी कृषी सहायक तांत्रिक मार्गदर्शन करतील. या योजनेंतर्गत तांत्रिक मंजुरीचे अधिकार तालुका कृषी अधिकारी व प्रशासकीय मंजुरीचे अधिकार उपविभागीय कृषी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.