ग्राहकांना पाण्याचे चौपट बिल
By Admin | Updated: January 14, 2017 00:14 IST2017-01-14T00:14:01+5:302017-01-14T00:14:01+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी बिलांचे कंत्राट दोन महिन्यांपासून खासगी कंत्राटदारांकडे सोपविले आहे.

ग्राहकांना पाण्याचे चौपट बिल
जीवन प्राधिकरणची मनमानी : देयकांचे काम खासगी कंत्राटदाराकडे
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी बिलांचे कंत्राट दोन महिन्यांपासून खासगी कंत्राटदारांकडे सोपविले आहे. परिसरातील ग्राहकांना २० हजार रूपयांपर्यंतची बिले येत आहेत. अवाढव्य देयक भरायचे कसे या चिंतेने गोरगरीब जनता त्रस्त आहे. यामनमानी कारभाराकडे निवडणुकीच्या वर्दळीत कोणाचेही लक्ष नाही, हे विशेष.
दोन ते तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असणारे पाणी देयकांचे काम प्राधिकरणाने खासगी कंपनीकडे सोपविले आहे. तेव्हापासूनच देयकांवर मीटर रिडिंगचे छायाचित्र देखिल छापून येत आहे. जेव्हापासून बिलांचे कामकाज खासगी कंपनीकडे गेले तेव्हापासून जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांना पाण्याचे बिल अव्वाचे सव्वा येत असल्याच्या तक्रारी आहेत. ज्या ग्राहकांना अवघे पाचशे रूपये बिल येत होते त्या ग्राहकाला दोन महिन्यांपासून पाच हजार, दहा हजार ते २० हजार रुपयांपर्यंतचे देयक प्राप्त होत आहे. वाढीव बिले कमी करण्यासाठी बडनेरा शहरातील जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांना संबंधित कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहे.
बडनेरा शहरात शेतकरी, गोरगरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अवाढव्य बिले पाहून ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. मनपा निवडणुकांच्या घाईगर्दीने मात्र राजकारणी, इच्छुक उमेदवारांना यागंभीर मुद्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया त्रस्त ग्राहकांमध्ये उमटत आहेत. चौकशी करिता गेलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधिकरणचे कर्मचारी उलटसुलट माहिती देत आहेत. मीटरचे रीडिंग घेऊन येण्याच्या सूचना त्रस्त ग्राहकांना दिल्या जात आहेत. अव्वाच्या सव्वा बिलांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील दोन वर्षांत पाण्याचे दर वाढलेले नाहीत. मग इतके बिल कसे काय, एकूणच जीवन प्राधिकरणच्या भोंगळ कारभारावर शहरवासीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
पाण्याच्या बिलांचे कंत्राट खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. बिलांवर मीटर रीडिंगचे छायाचित्रदेखील छापून येत आहे. बिले अधिक रकमेची येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. लवकरच सुरळीत बिले प्राप्त होतील. चुकीची बिले दुरूस्त केली जात आहेत. ग्राहकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण.
खासगी कंत्राटदारांकडून बडनेरा शहरात मनमानी देयके दिली जात आहे. चुकीच्या बिलांमुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. जीवन प्राधिकरणने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
- सिद्धार्थ बनसोड, सामाजिक कार्यकर्ता