-आता अधिग्रहित जमिनीचा चौपट आर्थिक मोबदला
By Admin | Updated: April 1, 2017 00:20 IST2017-04-01T00:20:18+5:302017-04-01T00:20:18+5:30
विविध प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मोबदला मिळत होता.

-आता अधिग्रहित जमिनीचा चौपट आर्थिक मोबदला
पालकमंत्र्यांचा पुढाकार : मुख्यमंत्र्यांकडून तत्त्वत: मान्यता, पेढी प्रकल्पग्रस्तांना दिलासा
अमरावती : विविध प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मोबदला मिळत होता. याबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्र्यांसह महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा परिपाक म्हणून आता मुख्यमंत्र्यानी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ चा गुणक देण्याला तत्वत: मान्यता दिली असून शेतकऱ्यांना त्यांच्या अधिग्रहित जमिनींचा चौपट मोबदला मिळणार आहे.
भातकुली तालुक्यातील २ हजार पेढी प्रकल्पग्रस्त कुटुंबांना यानिर्णयाचा आर्थिक लाभ होणार आहे. पालकमंत्री पोटे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ३० मार्च रोजी झालेल्या बैठकीत महसूल व वनविभाग सचिवांना तसे निर्देश दिले आहेत. याबैठकीला पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वनविभगाचे प्रधान सचिव विकास खारगे, संबंधीत खात्यांचे अधीकारी तसेच पेढी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
भूसंपादन व पुनर्वसन करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क व अधीनियम २०१३ हा कायदा १ जानेवारी २०१४ पासून अंमलात आला आहे. त्यामध्ये कलम २६ व ३० या तरतुदीमध्ये जमिनीचा मोबदला ठरविण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. अमरावती जिल्हा हा प्रादेशिक योजनेंतर्गत येत असल्यामुळे जमीन अधिग्रहण करताना १.५ गुणक वापरून शेतकऱ्यांना मोबदला मिळत होता. मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक योजना लागू नसल्याने व तेथे २ हा गुणक लागू होत असल्याने तेथील शेतकऱ्यांना चौपट आर्थिक मोबदला मिळत होता. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होऊन त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत होते. याबाबत पेढी प्रकल्पग्रस्त अळणगाव व अन्य ग्रामस्थांनी अमरावती येथे पालकमंत्र्यांची भेट घेतली होती.
त्याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्याबैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी २ हा गुणक लागू करण्याचे आदेश संबंधीत विभागांना दिल्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा २ चा गुणक लागू होईल. त्यामुळे आता जमीन अधिग्रहणाचा चौपट मोबदला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्
अळणगाव ग्रामस्थांची कैफियत
भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पबाधित अळणगाव व लगतच्या अन्य ग्रामस्थांनी मंगळवारी अल्प मोबदल्याची कैफियत पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे मांडली होती.त्याची दखल घेऊन पोटे यांनी तातडीने ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानी घालून मंत्रालयात बैठक लावण्याचा शब्द पेढीबाधिताना दिला. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी अळणगाव येथील विजय दुर्गे, नरेंद्र वानखडे, धनराज खर्चान, महेंद्र राऊत, नारायण दुर्गे, सहदेव महिंगे आदींची उपस्थिती होती.