‘त्या’ चार विद्यार्थ्यांनी रचला अपहरणाचा बनाव
By Admin | Updated: December 31, 2016 01:22 IST2016-12-31T01:22:40+5:302016-12-31T01:22:40+5:30
सकाळच्या सुमारास शाळेला जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या सहा व्यक्तींनी आपले

‘त्या’ चार विद्यार्थ्यांनी रचला अपहरणाचा बनाव
भाजीबाजार परिसरातील घटना : पालकांनी केला खुलासा
अमरावती : सकाळच्या सुमारास शाळेला जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या सहा व्यक्तींनी आपले अपहरण केले, मात्र, त्यांच्या हाताला चावा घेत आपण कशीबशी सुटका करून घेतल्याचे शाळकरी मुलांनी सांगताच एकच खळबळ माजली. या शाळकरी मुलांनी हा प्रकार मुख्याध्यापकांच्या कानावर घातला. पुढे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. मात्र, काही वेळात हा सर्व बनाव असल्याचे उघड झाले. शाळेला दांडी मारता यावी, या उद्देशाने आपण अपहरणाचा बनाव रचल्याचे त्या मुलांनी सांगताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला. मात्र, त्याचवेळी इतक्या लहानवयात या मुलांनी स्वताच्याच अपहरणाचा बनाव रचल्याने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आश्चर्य व्यक्त केले.
भाजीबाजार परिसरात महापालिकेची उच्च प्राथमिक हिन्दी व इंग्रजी शाळा क्रमांक ११ आहे. या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेचे दुपारचे सत्र १२ वाजताच्या सुमारास सुरु होते. याच शाळेत शिकणारे हाथीपुरा येथील चार मुले शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास भाजीबाजार स्थित मुरलीधर मंदिराजवळील मार्गाने शाळेकडे येत होते. दरम्यान पिवळ्या व लाल रंगाची व्हॅन मंदिराजवळ अचानक थांबली. त्यातून सहा बुरखाधारी अपहरणकर्ते बाहेर आले. त्यांनी आपले तोंड दाबून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हा चौघांनाही बंदीस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताला चावा घेत आपण कशीबशी सुटका करून घेतली व तेथून पळ काढला, अशी आपबिती या चार विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक गोपाल कांबळे यांच्याकडे विशद केली. या घटनेचे गांभीर्य बघता मुख्याध्यापक व पालकांनी तत्काळ खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तथा अपहरणाची माहिती पोलीस निरीक्षक कुरुळकर यांना दिल्याचे कांबळे यांनी सांगितले. पोलीस, पालक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी या परिसरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. तथा चौकशीला वेग दिला. दरम्यान त्या चारही विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत पाठविण्यात आले. तेथे मुख्याध्यापक गोपाल कांबळे यांनी या चौघांना विश्वासात घेऊन त्यांची उलटतपासणी घेतली. उलटतपासणीमध्ये या चारही शाळकरी विद्यार्थ्यांनी अपहरणाचा कुठलाही प्रयत्न झाला नसल्याचे सांगितले. टीव्ही सिरीयल पाहून आपल्याला अपहरणाची कल्पना सुचल्याचे एका विद्यार्थ्याने कांबळे यांना सांगितले. त्यानंतर हा सर्व बनाव उघड झाला. (प्रतिनिधी)