रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोन डॉक्टरांसह चारजणांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST2021-05-13T04:13:32+5:302021-05-13T04:13:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोन डॉक्टरांसह सहाजणांना पोलिसांनी मंगळवारी बनावट ग्राहक पाठवून शिताफीने अटक ...

रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोन डॉक्टरांसह चारजणांना पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या दोन डॉक्टरांसह सहाजणांना पोलिसांनी मंगळवारी बनावट ग्राहक पाठवून शिताफीने अटक केली. ही कारवाई सीपींचे विशेष पथक, शहर गुन्हे शाखा व एफडीए यांनी संयुक्तपणे केली. यावेळी आरोपींकडून विविध कंपन्यांची १० इंजेक्शन, दुचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल असा एकूण १५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस सुत्रांनुसार, शुभम कुमोद सोनटक्के (२४, रा. ठाकूर निवास, चपराशीपुरा), शुभम शंकर किल्हेकर (२४, रा. धोबी नाला, वडाळी), डॉ. अक्षय मधुकर राठोड (२४, रा. क्वार्टर ४, भातकुली आरोग्य केंद्र), पूनम भीमराव सोनोने (२६, रा. भेंडगाव, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला ), अनिल गजानन पिंजरकर (३८, रा. सर्वोदय कॉलनी, काँग्रेसनगर), डॉ. पवन दत्तात्रय मालुसरे (३५, रा. कॅम्प रोड, फ्रेजरपुरा) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ४२०, १८८, ३४ व औषधी प्रशासनाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, उपनिरीक्षक राजकिरण येवले तसेच सहाय्यक निरीक्षक पंकज चक्रे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केली.
बॉक्स:
बनावट ग्राहक पाठवले
सुपर स्पेशालिटीतील कोविड रुग्णालयामधील एक अटेडन्ट रेमडेसिविरचा काळाबाजार करत असल्याची माहिती पथकाला मिळताच एका पोलीस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून पाठविण्यात आले. एफडीएचे औषध निरीक्षक मनीष गोतमारे यांचे पथक व पंच त्याच्या संपर्कात होते. बनावट ग्राहकाने संपर्क साधला. कॅम्प कॉर्नर येथे ६०० रुपये किमतीचे रेमडेसिविर इंजेक्शन १२ हजार रुपयांना देण्याचे ठरले. यावेळी आरोपींची खात्री पटल्यानंतर कोविड रुग्णालयातील अटेडन्ट शुभम सोनटक्के व डफरिन मार्गावरील महावीर हॉस्पिटलमधील अटेडन्ट शुभम किल्हेकर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन व दोन दुचाकी पथकाने जप्त केल्या. त्यांनी डॉ. अक्षय राठोड याच्याकडून रेमडेसिविर मिळाल्याची माहिती दिली. त्याला पथकाने भातकुली आरोग्य केंद्रातून ताब्यात घेतले. त्याच्या चारचाकी वाहनातून एक रेमडेसिविर जप्त केले. त्याला पथकाने बोलते केले असता, इर्विन रुग्णालयातील स्टाफ नर्स पूनम सोनोने हिचे नाव पुढे आले. तिला महिला पोलीस भारती ठाकूर यांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता, तिच्याकडे एक रेमडिसिविर इंजेक्शन मिळाले. तिने हे इंजेक्शन संजीवनी कोविड हेल्थ सेंटरमधील डॉक्टर व टेक्निशियन पुरवत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर लॅब असिस्टंट अनिल पिंजरकर व डॉ. पवन मालुसरे यांच्याकडून पाच रेमडेसिविर इंजेक्शन चारचाकी वाहनाच्या डिक्कीतून जप्त करण्यात आली.
बॉक्स:
१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या कारवाईत विविध कंपन्यांची १ लाख २० हजार रुपयांना विकली जाऊ शकणारी दहा रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केली. तसेच १ लाख १० हजारांच्या दोन दुचाकी व १२ लाखांची दोन चारचाकी वाहने असा एकूण १५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.