कोरोना संक्रमितांचे आठ दिवसात चार उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:52+5:30
या आठ दिवसांत कोरोना संक्रमितांचे तीन उच्चांक स्थापित झाले. यामध्ये २८ ऑगस्टला २०६ संक्रमित निष्पन्न झाले, ही तोपर्यतची सर्वाधिक संख्या होती. हा उच्चांक ३ सप्टेंबरला मोडीत निघाला. या दिवशी २१८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर ५ सप्टेंबरला २२७ व ६ ला २६८ रुग्णांची नोंद झाली. ही संख्या कोरोना संसर्ग काळातील सर्वाधिक संख्या असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

कोरोना संक्रमितांचे आठ दिवसात चार उच्चांक
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतच आहे. आठ दिवसांत संक्रमित रुग्णांचे चार उच्चांक स्थापित झाले. ६ सप्टेंबरला झालेली २६८ रुग्णांची नोंद ही पाच महिन्यांच्या संक्रमण काळातील सर्वाधिक संख्या आहे. सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत विक्रमी १०५४ कोरोनाग्रस्तांच्या नोंदीनेदेखील जिल्ह्याची चिंता वाढविली आहे.
या आठ दिवसांत कोरोना संक्रमितांचे तीन उच्चांक स्थापित झाले. यामध्ये २८ ऑगस्टला २०६ संक्रमित निष्पन्न झाले, ही तोपर्यतची सर्वाधिक संख्या होती. हा उच्चांक ३ सप्टेंबरला मोडीत निघाला. या दिवशी २१८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर ५ सप्टेंबरला २२७ व ६ ला २६८ रुग्णांची नोंद झाली. ही संख्या कोरोना संसर्ग काळातील सर्वाधिक संख्या असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात ४ एप्रिलला झालेल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या नोंदीनंतरच्या पाच महिन्यात जिल्ह्यात तब्बल ७००४ कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात ४ एप्रिलला १ रुग्ण, त्यानंतरच्या १० दिवसात फक्त ५ रुग्णांची भर पडली. १ मे रोजी ४० रुग्ण म्हणजेच जिल्ह्यातील कोरोना संक्रमण काळाच्या पहिल्या महिन्यात कोरोनाचे फक्त ४० रुग्ण होते. त्यानंतर १५ मेपर्यत ५० रुग्णांची भर पडल्याने ९० झालेत. त्यानंतर मात्र रुग्णसंख्या वाढायला लागली. नंतरच्या १५ दिवसांत १ जुलै रोजी ५६९ रुग्णसंख्या झाली. पहिल्या एक हजार कोरोनाग्रस्ताची नोंद १५ जुलै रोजी झाली. त्यानंतर १ ऑगस्टला २१५७ रुग्णांची नोंद झाली होती.
लॉकडाऊन-३ च्या शिथिलतेनंतर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. यामध्ये ५ ऑगस्टला २५९८ रुग्ण, १० ऑगस्टला ३१६८ रुग्ण, १५ ऑगस्टला ३५५८ संक्रमित, २० ऑगस्टला ४१३९ रुग्ण, २५ ऑगस्टला कोरोनाग्रस्तांची संख्या ४६८७ वर पोहोचली. यानंतर जिल्ह्यात कोरोनाच्या उदे्रकाला सुरुवात झाली. रोज कोेरोनाचा ब्लास्ट व्हायला लागला. ऑगष्ट महिन्याअखेर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५५९२ वर पोहोचली व ६ सप्टेंबरला ७००४ झाली असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
रिकव्हरी रेट ७५.२८ जिल्हयात कोरोना संसर्गाच्या पाच महिन्यांत ६७३६ कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. त्यातुलनेत आतापर्यंत ५२७३ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या काळात त्यांना १४ दिवस गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत ७८५ कोरोनाग्रस्तांना संक्रमणमुक्त करण्यात आलेले आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचे प्रमाण ७५.२८टक्के आहे. जिल्ह्यात ८० टक्क्यांवर रुग्ण असिम्टमॅटीक असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेटदेखील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.