चार सदस्यीय प्रभाग प्रणालीला न्यायालयात आव्हान
By Admin | Updated: June 1, 2016 00:51 IST2016-06-01T00:51:22+5:302016-06-01T00:51:22+5:30
सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग प्रणाली कार्यन्वित होणार आहे.

चार सदस्यीय प्रभाग प्रणालीला न्यायालयात आव्हान
विरोध वाढला : रिपाइं गट याचिका दाखल करणार
अमरावती : सन २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग प्रणाली कार्यन्वित होणार आहे. तथापी ही प्रणाली उपेक्षित हिंदूच्या विरोधात असल्याचा आक्षेप नोंदवीत रिपाइं आठवले आणि आंबेडकर गटांकडून अध्यादेशातील तरतुदीला न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.
महापालिकेच्या फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या निवडणुका प्रभाग पद्धतीने होणार आहेत. एका प्रभागातून चार सदस्य निवडीचा अध्यादेश दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला. एका प्रभागातून दोन महिला व दोन पुरूष असे सूत्र आखले गेले आहे. तथापी या निर्णयाला रिपाइंचे खासदार रामदास आठवले आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. चार सदस्यीय पद्धतीचा निर्णय भाजप धार्जिणा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडण्याच्या पद्धतीमुळे राज्य आणि देशपातळीवरील राजकीय पक्षांना फायदा मिळू शकतो. अपक्ष किंवा लहान पक्षांच्या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो, असे राजकीय पक्षाच्या नेत्याचे मत आहे. या प्रार्श्वभूमीवर १९ मे रोजी काढलेल्या अध्यादेशातील महापालिके संदर्भातील तरतुदींना आव्हान देण्याचा निर्णय आठवले आणि आंबेडकर यांनी घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात रीट याचिका दाखल केली जाणार आहे. रिपाइं आठवले गटाचे अमरावतीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दंदे व त्यांचे सहकारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल करणार आहेत. १९९२ पासून सुरू असलेला वॉर्ड आणि प्रभागाचा हा खेळ बंद करावा, अशी जोरकस मागणी रिपाइं लावून धरणार आहे. एका प्रभागात चार नगरसेवक असल्यास ते चारही उलट दिशेने राहतील आणि परिणामी वॉर्ड वाऱ्यावर सुटेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अध्यादेशाऐवजी कायदा करावा, अशी आग्रही मागणी रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
चार सदस्यीय प्रभाग प्रणालीचा अध्यादेश धडकल्यानंतर महापालिकेतील नगरसेवकांमधील अस्वस्थता वाढीला लागली आहे. अपक्ष आणि स्थानिक स्तरावर आघाडी करून निवडणुका लढविणाऱ्यांवर तर या प्रणालीने तलवारच कोसळली आहे. त्यांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे. रिपाइं गटासोबतच अन्य काही नगरसेवकही अध्यादेशातील महानगरपालिकेसंदर्भातील तरतुदीविरोधात आव्हान देणार आहे. (प्रतिनिधी)