संचारबंदीत रोज चार तासांची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:35+5:30
औषधी केंद्रे व रुग्णालयांना वेळेची मर्यादा नाही. धान्य, किराणा, फळे, भाजीपाल्याची विक्री महापालिका, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या जागेतच करावी लागेल. या ठिकाणी १०० मीटर परिसरात पाचपेक्षा जास्त किरकोळ विक्रेते असणार नाहीत. शहरी, तसेच ग्रामीण भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांनी, जमावाने एकत्रित जमू नये. अनावश्यकरीत्या गावात शिरू नये किंवा फिरू नये.

संचारबंदीत रोज चार तासांची मुभा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (२) अन्वये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नव्या तरतुदींचा समावेश करून आदेश जारी केला आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्रीची वेळ आता सकाळी ८ ते दुपारी १२ अशी निश्चित करण्यात आली आहे. हे आदेश ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.
औषधी केंद्रे व रुग्णालयांना वेळेची मर्यादा नाही. धान्य, किराणा, फळे, भाजीपाल्याची विक्री महापालिका, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेने नेमून दिलेल्या जागेतच करावी लागेल. या ठिकाणी १०० मीटर परिसरात पाचपेक्षा जास्त किरकोळ विक्रेते असणार नाहीत. शहरी, तसेच ग्रामीण भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांनी, जमावाने एकत्रित जमू नये. अनावश्यकरीत्या गावात शिरू नये किंवा फिरू नये. अमरावती शहर व जिल्ह्यातील हद्दी बंद करण्यात येत आहेत. अत्यावश्यक वस्तू-सेवांना हे लागू होणार नाही. सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक, त्यात शहर बससेवेवरही बंदी घालण्यात येत आहे. विशेष कारणांसाठी टॅक्सीमध्ये चालकासह दोन प्रवासी व ऑटोरिक्षामध्ये चालकासह एक प्रवासी बसू शकेल. वैद्यक सेवा व आपत्कालीन सेवेतील वाहतुकीस मुभा आहे. खासगी वाहनाला एक प्रवासी व चालकासह अत्यावश्यक वस्तूसाठी व आरोग्य सेवांसाठी व इतर अत्यावश्यक कारणासाठी नेण्याची मुभा राहील.
अमरावती जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बस, खासगी प्रकारची सर्व वाहतूक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बससेवा, महापालिका हद्दीतील बससेवा, ऑटोरिक्षाची सेवा बंद राहील. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत व रूग्णांच्या सेवेसाठी नागरिकांना रिक्षाची सेवा व स्वत:च्या खासगी वाहनाची सेवा घेण्याची मुभा राहील. जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणांसाठीच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात वाहतुकीची सेवा सुरू राहील. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रक, मालमोटारी, रिक्षा वाहने यांना मुभा राहील.
धार्मिक स्थळे, प्रार्थनागृहांना आदेश लागू
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकाने समाजामध्ये अफवा, अपप्रचार व भीती निर्माण होईल, अशा प्रतिक्रिया समाज माध्यमाद्वारे प्रसारित करू नये. महाआरती, समूहपठण, धर्मपरिषदांचे आयोजनाचे कृत्य व विधी करू नये. मिरवणुका, सभा, रॅली, सामूहिक कार्यक्रम, भाषणबाजी, उद्घोषणेला प्रतिबंध करण्यात आला आहे. धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे यांनाही आदेश लागू आहेत. प्रार्थनास्थळांवर पूजाअर्चा पाचपेक्षा कमी व्यक्तींद्वारे सुरू राहील.