नदी सौंदर्यीकरणासाठी चार कोटींना मान्यता
By Admin | Updated: May 23, 2016 00:24 IST2016-05-23T00:24:06+5:302016-05-23T00:24:06+5:30
परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहराच्या नदी सौंदर्यीकरणासाठी चार कोटी रुपयांचा योग्य विनियोग करण्यासोबत घरकुलाचे अर्ज त्वरित

नदी सौंदर्यीकरणासाठी चार कोटींना मान्यता
नगरविकास राज्यमंत्र्यांची बैठक : जुळ्या शहरात महिलांसाठी शौचालय
परतवाडा : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहराच्या नदी सौंदर्यीकरणासाठी चार कोटी रुपयांचा योग्य विनियोग करण्यासोबत घरकुलाचे अर्ज त्वरित आॅनलाईन करा व जुळ्या शहरातील महिलांसाठी आवश्यक ठिकाणी शौचालये उभारण्याच्या सूचना नगरविकास तथा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी परतवाडा येथील शासकीय विश्रामगृहावर दिल्या.
यावेळी शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ राजेश उभाड, भाजपचे सरचिटणीस गजानन कोल्हे, जिल्हाध्यक्ष रूपेश ढेपे, नीलेश सातपुते, प्रवीण तोंडगावकर, राजा पिंजरकर, सुधीर रसे, साहेबराव काठोळे, राजेंद्र जैस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अचलपूर नगरपालिकेला नदी सौंदर्यीकरणांतर्गत ४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यावर योग्य पद्धतीने तो खर्च करावा, त्यासाठी तज्ज्ञाची मदत घेण्याच्या सूचना रणजित पाटील यांनी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांना दिल्यात. घरकुलाची आॅनलाईन प्रक्रिया तत्काळ करून शासनाला अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले, तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकी देण्याची मागणी अनिल तायडे यांनी केली. (प्रतिनिधी)
नातवाला लाईन, जावायाची बदली
राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे शहराच्या समस्यांसोबत आपल्या परिवारातील समस्यासुद्धा काही भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडल्यात. अचलपूर शहरात विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. मात्र सोबत आपणास ‘नातू’ झाला तोसुद्धा लाईन व उकाड्याने झोपत नाही. तेव्हा वीज मंडळाला ताकिद देण्याच्या ओघात या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगून टाकले. सोबत या त्रासापासून नातवाचा बचाव करण्यासाठी हजार रुपयांचा बॅटरीवाला पंखा आणल्याची पावती जोडली. पुन्हा शहरातील रस्ते फारच खड्डेमय झाले असल्याची सर्वसामान्य तक्रार करीत, जाता जाता माझ्या जावायाची बदली करून देण्याची गळ घालताच एकच हशा पिकला.
महिलांसाठी शौचालय
परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात महिलांसाठी कुठेच शौचालय नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. जुळ्या शहरात आवश्यक त्या ठिकाणी शौचालय तयार करण्याचे निर्देश यावेळी नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिले. शिक्षक व इतर क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या समस्या यावेळी मांडल्या.