चार वर्षांत चार कोटींचा गुटखा जप्त
By Admin | Updated: June 13, 2015 00:24 IST2015-06-13T00:24:05+5:302015-06-13T00:24:05+5:30
गुटखा व पानमसाला बंदी लागू होऊन तीन वर्ष ओलांडून गेल्यावरही आज छुप्या मार्गाने विक्री सुरुच आहे.

चार वर्षांत चार कोटींचा गुटखा जप्त
३०६ जणांविरूध्द फौजदारी : अन्न, औषधी प्रशासन विभागाची धडक कारवाई, विक्रेत्यांची गोची
वैभव बाबरेकर अमरावती
गुटखा व पानमसाला बंदी लागू होऊन तीन वर्ष ओलांडून गेल्यावरही आज छुप्या मार्गाने विक्री सुरुच आहे. मागील चार वर्षात अन्न व औषधी प्रशासन विभागाने जवळपास चार कोटीचा गुटखा व पानमसाला जप्त केला असून ३०६ जणाविरूध्द फौजदारी कारवाई केली आहेत.
महाराष्ट्रात गुटखा व पानमसाला विक्रीला बंदी आहे. मात्र, चार वर्षांच्या कारवाईचा आलेख बघता अद्यापही गुटखा व पानमसाला विक्री सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. तबांखूजन्य उत्पादनाच्या सेवन हे कर्करोगास आमंत्रण देणारे ठरते. मात्र, आरोग्याची पर्वा न करता बहूतांश नागरिक गुटखा व पानमसालाचे सेवन करीत आहेत. त्यामुळेच व्यवसायीकांचे व्यवसाय चांगलेच फोफावत आहेत.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाचे धाडसत्र सुरुच आहे. २० जुलै २०१२ ते १९ जुलै २०१३ मध्ये अन्न व औषधी प्रशासनाने १५९ ठिकाणी धाड टाकून १ कोटी २७ लाख १० हजार ७१० किंमतीचा गुटका व पानमसाला जप्त केला आहे. त्यामध्ये ६४ व्यवसायीकांविरूध्द फौजदारी कारवाई केली असून १४७ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. २० जुलै २०१३ ते १९ जुलै २०१४ दरम्यान १६६ ठिकाणी धाडी टाकून १ कोटी १९ लाख ६० हहजार ३६१ रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे.
त्यामध्ये १६२ व्यवसायीकांविरूध्द फौजदारी कारवाई केली असून १३६ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तसेच २० जुलै २०१४ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान १०३ ठिकाणी धाड टाकून १ कोटी १६ लाख ९३ हजार ६८४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये आतापर्यंत १०० व्यवसायीकांविरूध्द फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.
गुटखा बंदीनंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात विभागात गुटखा व पानमसाला विक्री होतच आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरणारा गुटखा व पानमसाला बंदी लागू केल्यानंतरही त्यांच्या विक्रीत मोठी झाली आहे.
गुटखा व पानमसाला विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र, तरीसुध्दा गुटखा व पानमसाला बंदीवर परिणाम का होत नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनाने लक्ष वेधून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जनसामान्याची मागणी आहे.
गुटखा व पानमसाला बंदी लागू झाल्यापासून छुप्या मार्गाने विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अन्न व औषधी प्रशासनाकडून कारवाई होत आहे. मात्र, नागरिकांच्या मागणीमुळे छुप्या मार्गाने गुटखा व पानमसाला व्यवसाय होत आहे.
- मिलींद देशपांडे,
सहायक आयुक्त (अन्न).