चार सभापती अद्यापही विषय समितीबाहेरच
By Admin | Updated: January 3, 2017 00:18 IST2017-01-03T00:16:22+5:302017-01-03T00:18:38+5:30
जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील दहा विषय समित्यांवर १२ डिसेंबर २०१४ पासून अद्यापही चार पंचायत समितीच्या सभापतींना प्रतिनिधीत्व देण्यात आले नाही.

चार सभापती अद्यापही विषय समितीबाहेरच
जिल्हा परिषद : अडीच वर्षांपासून त्यांची बोळवणच, कार्यकाळही संपुष्टात येण्याच्या मार्गावर
जितेंद्र दखने अमरावती
जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील दहा विषय समित्यांवर १२ डिसेंबर २०१४ पासून अद्यापही चार पंचायत समितीच्या सभापतींना प्रतिनिधीत्व देण्यात आले नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांवर भारी पडल्याची चर्चा मिनीमंत्रालयात सुरू आहे.
जिल्हा परिषद सभागृहाची निर्वाचित सदस्य संख्या ५९ आहे. पंचायत समितींच्या सभापतींची संख्या १४ आहे, तर झेडपी पदाधिकाऱ्यांची संख्या ६ आहेत. दहा विषय समित्यांवर असलेल्या सदस्यांची एकूण संख्या ८३ आहे. अडीच वर्षांच्या सत्ताकाळात अद्यापपर्यंत ४ विषय समित्यांमध्ये ८ जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे या समित्यावर जि.प. आणि पं. समितींच्या सभापतींना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद आहे. परंतु अद्यापही चार पंचायत समितीच्या सभापतींना एकाही विषय समितीवर स्थान देण्यात आले नाही. यामध्ये तिवसा पंचायत समितींच्या सभापती अर्चना वेरूळकर, चांदूररेल्वेचे सभापती किशोर झाडे, धामणगाव रेल्वेच्या सभापती गणेश राजनकर आणि धारणीच्या सभापती सुनीता पटेल या चार सभापतींची १४ डिसेंबर २०१४ रोजी सभापती पदावर निवड झाली आहे. मात्र या निवडीपूर्वीच जि.प.त विषय समितीवर प्रतिनिधीत्व निवडण्यासाठी १२ डिसेंबर २०१४ तर १६ फेब्रुवारी २०१५ व त्यानंतरही दोन विशेष सभा घेण्यात आल्यात. मात्र तरीही भाजपाच्या या चार पंचायत समितींच्या सभापतींना जि.प. विषय समितीवर प्रतिनिधीत्वाची संधी दिली नाही.
सुरूवातीला वाद, नंतर चुप्पी
जिल्हा परिषदेत अडीच वर्षांच्या शेवटच्या टप्यात नव्याने विषय समितीवर सदस्य निवड प्रक्रियेवरून काँग्रेस व विरोधी पक्षात सुरूवातीला यासाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत चांगलाच वाद झाला. यावरच हा प्रकार थांबला नाही तर विभागीय आयुक्ताकडे यावर दाद मागगितली. तत्कालीन आयुक्तांनी आपले मार्गदर्शन लेखी कळवून निर्णय घेण्याचे सुचविले होते. परंतु काही महिन्यांपासून या वादावर कुणीही भाष्य केले नाही. आता तर सर्वांनीच चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे.