गजानन मोहोड
अमरावती : फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील चार बनावट शेतकरी खातेदारांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. काही जिल्ह्यांत असाच प्रकार उघडकीस आल्याने कंपनीस्तरावर याची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये तांत्रिक चुका असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या २५ जानेवारीच्या आदेशान्वये जिल्ह्यात विमा कंपनीस्तरावर पडताळणी सुरू आहे. या योजनेत जिल्ह्यातील ३,६०३ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे व आतापर्यंत ५०० खातेदारांच्या विमा संरक्षित क्षेत्राची पाहणी कंपनीच्या पथकाने केलेली आहे. अन्य जिल्ह्यांत ज्या पद्धतीने गंभीर प्रकार उघडकीस आलेले आहेत, तसा प्रकार आपल्या जिल्ह्यात झाल्याचे अद्यापपर्यंत निदर्शनास आले नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली.'ते' खातेदार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील
फळपीक विमा योजनेतील ते चार खातेदार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहेत. यामध्ये एका शेतकऱ्याने सहभाग घेतल्यानंतर केळी उपटून टाकली. अन्य एकाचे विमा संरक्षित क्षेत्र जास्त आहे. योजनेत केवळ दोन हेक्टरपर्यंत सहभाग घेता येतो. अन्य दोन खातेदारांच्याही अशाच प्रकारच्या तांत्रिक त्रुटी असल्याचे कंपनी प्रतिनिधीने ‘लोकमत’ला सांगितले.