रामटेकेंवर गोळीबार प्रकरणी चार आरोपी गजाआड
By Admin | Updated: July 13, 2014 00:50 IST2014-07-13T00:50:32+5:302014-07-13T00:50:32+5:30
नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्या आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली.

रामटेकेंवर गोळीबार प्रकरणी चार आरोपी गजाआड
अकोला/आकोट : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्या आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली. यातील दोघांना सकाळी अकोल्यात तर दोघांना आकोटमधून शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अटक केली. याशिवाय दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघा आरोपींना शनिवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास न्यायाधीश डी. हरणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. नगरसेवक अजय रामटेके यांच्यासह मो.फजलू पहेलवान व त्यांचे चुलत भाऊ रसूल खान हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी मुंबईला गेले होते. ते शुक्रवारी सकाळी मुंबई हावडा मेलने अकोल्यात पोहोचले. तिघांनीही ऑटोरिक्षा केला आणि ते गुलजारपुर्यात जाण्यासाठी निघाले. त्यांचा ऑटोरिक्षा अग्रसेन चौकात येताच दबा धरून बसलेल्या ६ आरोपींनी मोटारसायकलने ऑटोरिक्षाचा पाठलाग करून देशीकट्टय़ातून गोळी झाडली आणि त्यानंतर दामले चौकातसुद्धा आरोपींनी अजय रामटेके यांच्यावर देशीकट्टय़ातून पुन्हा दोन गोळय़ा झाडल्या. त्यानंतर धारदार कत्त्याने त्यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी कुख्यात गुंड संतोष उर्फ भद्या वानखडे, गणेश किसनराव सोनोने, सोनू काशीनाथ जाधव, शेख मोहसिन शेख समद, सोनू रमेश अंबेरे आणि सागर त्र्यंबक सरोदे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी सागर सरोदे आणि शेख मोहसिन या दोघांना उशिरा रात्री अटक केली. या दोघांनाही न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान पोलिसांना प्रमुख आरोपी संतोष उर्फ भद्या वानखडे व सोनू जाधव हे दोघे आकोटमार्गे मध्य प्रदेशात पळून जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून आकोटमधून या दोनही आरोपींना ताब्यात घेतले
. ** मोहसिन व सागरने स्वत:वरच केले वार
नगरसेवक रामटेकेंवर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी शेख मोहसिन व सागर सरोदे यांनी ब्लेडने वार करून स्वत:ला जखमी केले आणि हल्ला प्रकरणात आम्ही नव्हतोच, असे भासविण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेतच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी संतोष उर्फ भद्याने आमच्यासोबत वाद घालून आम्हा दोघांवर हल्ला चढविला. त्यात आम्ही जखमी झालो. आमचा हल्ल्याशी काही संबंध नाही, असे सांगून सुरुवातीला आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केली; परंतु नंतर त्यांनीच स्वत:वर वार करून जखमी केल्याचे पोलिसांना सांगितले.
** भद्या व सोनूचे आलिशान फ्लॅट
शुक्रवारी आरोपी भद्या वानखडे व सोनू जाधव यांच्या घरांची झडती घेण्यासाठी पोलिस गेले. पोलिसांनी एमराल्ड कॉलनीतील या दोघांच्याही आलिशान फ्लॅटची पाहणी केली असता, फ्लॅटमधील फर्निचर, टीव्ही व इतर साहित्य पाहून पोलिसही आवाक झाले. या गुंडांच्या टोळीने खंडणीची मागणी, जीवे मारण्याच्या धमक्या देत, हे आलिशान फ्लॅट बळकावले. एवढेच नव्हेतर शहरातील बिल्डर, व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचे कामही या टोळीकडून होते. टोळीतील तीन ते चार गुंडांना तर बिल्डरांनी आलिशान फ्लॅटच भेट दिला आहे.
** आणखी दोघे संशयीत ताब्यात
दरम्यान, या प्रकरणी आणखी दोन आरोपी बंटी अशोक उज्जैनकर आणि मनीष प्रकाश पाचपोर यांना अकोट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनू काशिनाथ जाधव आणि संतोष प्रभाकर वानखडे या दोघांना पोलिस स्टेशनमध्ये आणले असता बंटी अशोक उज्जैनकरआणि मनीष प्रकाश पाचपोर हे दोघे दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनी संतोष वानखडेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे संशय बळावल्यावरून पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेत चौघांचीही अकोला येथे एलसीबीकडे रवानगी केली.
** मोटारसायकल टोळीतील सहकार्याची!
पोलिसांनी शुक्रवारी दामले चौकातून जप्त केलेली एमएच ३0 एजे ६४१ क्रमांकाची मोटारसायकल ही धनंजय पिल्लेवार याची निघाली. घटनेच्या दिवशी ही मोटारसायकल शेख मोहसिन व सागर सरोदे यांच्याकडे होती. हल्ल्यामध्ये ही मोटारसायकल वापरण्यात आली. मोटारसायकलवर रक्ताचे शिंतोडे उडालेले दिसून येतात. त्यामुळे ही मोटारसायकल त्यांच्याकडे कशी आली. या टोळीशी पिल्लेवार याचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत.
** अंबेरे याला अटक नाही
हल्ल्यामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून शुक्रवारी पोलिसांनी सोनू अंबेरे याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने हल्ल्यात आपण सहभागी नव्हतो. घटना काय घडली, हे सुद्धा आपल्या माहिती नाही, असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शनिवारी सकाळी रुग्णालयामध्ये जाऊन अजय रामटेके यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू अंबेरे हल्ल्यामध्ये नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सोनू अंबेरे याला अटक केली नाही.
** कारने मध्य प्रदेशात पळून जाण्याचा प्रयत्न
आरोपी संतोष उर्फ भद्या प्रभाकर वानखडे व सोनू जाधव हे दोघे एमएच २२ एम २३ क्रमांकाच्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने आकोटमार्गे मध्य प्रदेशात पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आकोटचे ठाणेदार कैलास नागरे यांनी ताफ्यासह अकोला मार्गावर नाकाबंदी केली आणि अकोला नाक्यानजीक पोलिसांनी चहूबाजूंनी घेराव घालून आरोपींची कार अडविली आणि त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कारची झडती घेतली; परंतु कारमध्ये काहीच आढळून आले नाही.
** अडविल्यानंतरही निसटले
अकोला मार्गावरील सूर्या ढाब्याजवळ पोलिसांचे एक पथक दबा धरून बसले होते. दरम्यान वेगाने येणारी लाल रंगाची कार पथकातील एएसआय वेदप्रकाश चव्हाण, देवराव भोजने तथा पंकज पांडे यांना दिसताच, त्यांनी कारला अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु कार थांबली नाही. आरोपी वेगाने पुढे निघून गेले. आकोट मार्गावर आधीच तैनात असलेल्या कैलास सानप, प्रशांत इंगळे, सतीश बोदडे, उमेश पराये, चंद्रशेखर नेवारे या कर्मचार्यांच्या दुसर्या पथकाला सूचना मिळताच त्यांची गाडी समोरून आरोपींच्या दिशेने धावू लागली. मागाहून पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. दोन्ही पथकांनी कार घेरली आणि रिव्हॉल्वर रोखून त्यांना अडविले.
** असा झाला युक्तिवाद
आरोपी मोहसिन व सागर सरोदे यांना न्यायाधीश सोनटक्के यांच्या न्यायालयात हजर केल्यावर सहायक पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी आरोपींना २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीची मागणी केली; परंतु आरोपीचे वकील केशव एच. गिरी यांनी विरोध केला आणि घडलेल्या गुन्हय़ामध्ये पोलिसांना आरोपींकडून माहिती मिळाली. आरोपींचे नावे मिळाली, मोटारसायकलही जप्त झाली. त्यामुळे आरोपींना कोठडी देऊ नये, अशी मागणी केली. सरकारतर्फे श्रीमती व्ही.डी. सोनटक्के (नायसे) यांनी बाजू मांडली.