आदर्श ग्राम यावलीत शहीद विकासाची पायाभरणी
By Admin | Updated: June 8, 2015 00:26 IST2015-06-08T00:26:27+5:302015-06-08T00:26:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सांसद आदर्श ग्राम साकारण्यासाठी खा. आनंदराव अडसूळ यांनी ...

आदर्श ग्राम यावलीत शहीद विकासाची पायाभरणी
शाळांमध्ये ई-लर्निंग : १०.५० कोटींच्या कामांना प्रारंभ
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सांसद आदर्श ग्राम साकारण्यासाठी खा. आनंदराव अडसूळ यांनी जिल्ह्यातील यावली शहीद या गावाची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यात दोन शाळांमध्ये ई-लर्निंग प्रणाली सुरु करुन या गावात विकासाच्या पायाभरणीला सुरुवात करण्यात आली आहे.
राष्टसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मभूमी असलेले यावली हे गाव म्हणजे स्वातंत्र्य संग्रामापासून अस्तित्वात आहे. आठ विरांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हौतात्म्य पत्करले. यावली शहीदला समर्पणाचा इतिहास असल्याने खा. अडसूळ यांनी याच गावाची निवड करुन नवा आदर्श रचला. ग्रामविकासाचा मंत्र राज्य नव्हे तर देशभरात दिला. त्याच गावात सांसद आदर्श ग्राम योजना राबविण्यात आली पाहिजे, यासाठी खा. अडसूळ स्वत: आग्रही होते. त्यानुसार सांसद आदर्श ग्राम योजनेची मुहूर्तमेढ यावली शहीद येथे रोवण्यात आली. शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर देताना ई-लर्निंग प्रणाली सुरु करण्यात आली. आठ लाख रुपये किमतीचे डिजिटल व्हर्टिकल बोर्ड बसविण्यात आले आहे. परिणामी येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी इंग्रजीचे धडे गिरवतील, हे वास्तव आहे.
या गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे ९७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून मुख्य पीक म्हणून दरवर्षी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. १० लाख मेट्रिक टन कांद्याचे या गावात उत्पादन होत असल्याची नोंद आहे. कांदा चाळ व धान्य गोदामाची मागणी असून तसा प्रस्ताव नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे. या गावाचा सूक्ष्मनियोजन आराखडा ग्रामस्थांद्वारेच तयार होत आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार सुरेश बगळे, यशदाच्या मुख्य प्रशिक्षक सीमा मोरे, शशांक रायबोर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे हे या गावाचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी कटाक्षाने प्रयत्नशील आहेत. गावात नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंचपदी अलका दामले यांची निवड झाल्यानंतर खा. आनंदराव अडसूळ यांनी एका बैठकीत त्यांचा सत्कारदेखील केला आहे. गावाचा आराखडा तयार केल्यानंतर तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
या कामांना मिळाली मंजुरी
पहिल्या टप्प्यात दोन शाळांमध्ये ई-लर्निंग प्रणाली सुरु होणार आहे. शाळांमध्ये शुद्ध पाणी, जलशुद्धिकरण यंत्रणा, राष्ट्रीय देना बँक शाखा स्थापन, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, आधार कार्ड, प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत १७५ नवीन खाते उघडण्यात आली आहेत. महिला आरोग्य शिबिर, शहीद स्मारक समितीच्या वतीने कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. शिधापत्रिका नोंदणी शिबिरे, दोन नवीन बोअरवेल सुरु करण्यात आल्या आहेत.
गावाला नवा 'लूक' देण्याचा मानस
यावली शहीद हे गाव आदर्श ग्राम योजनेतून विकसित करताना नवा 'लूक' देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. मुख्य रस्त्याचे सुशोभिकरण, एलईडी हायमास्ट विद्युत मनोरे, महिलांसाठी स्वच्छतागृह, प्रवासी निवारा, नवीन २५ पथदिव्यांची निर्मिती, ३५० लाभार्थ्यांची शौचालयासाठी निवड, जलयुक्त शिवार योजनेत ११ सिमेंट साखळी बंधारे मंजूर, लोकसहभागातून तलाव बांधणी, आरोग्य उपकेंद्राची निर्मिती, उद्याने, घरकुले, गृहनिर्माण संस्था, १२२५ कुटुंबाचे सर्वेक्षण करुन ती माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.