दादासाहेब गवर्इंच्या स्मारकाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी
By Admin | Updated: July 20, 2016 00:03 IST2016-07-20T00:03:24+5:302016-07-20T00:03:24+5:30
ज्येष्ठ दलित नेते, माजी राज्यपाल रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे शासनाकडून भव्यदिव्य स्मारक साकारले जात आहे.

दादासाहेब गवर्इंच्या स्मारकाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी
२५ जुलैला कार्यक्रम : जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी
अमरावती : ज्येष्ठ दलित नेते, माजी राज्यपाल रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे शासनाकडून भव्यदिव्य स्मारक साकारले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ जुलै रोजी या स्मारकाची पायाभरणी होणार आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जागेची पाहणी केली आहे.
मार्डी मार्गालगत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागील बाजूस महसूलच्या जागेववर दादासाहेब गवई यांचे भव्यदिव्य स्मारक साकारले जाणार आहे. या स्मारकाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. स्मारकस्थळी दादासाहेब गवई यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीचे बोलके चित्रण राहणार आहे. विधीमंडळ ते लोकसभा असा दादासाहेब गवर्इंचा राजकीय प्रवास या स्मारकात अधोेरखीत केला जाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या महत्प्रयासाने जागेचा प्रश्न सुटला आहे. विद्यापीठाशेजारी असलेल्या महसूलच्या २२ एकर परिसरात त्यांचे स्मारक पूर्णत्वास जाणार आहे. या स्मारकाची पायाभरणी करण्याचे शासनाने निश्चित केले असून २५ जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीत येत आहेत.
कार्यक्रम होईल भव्यदिव्य
अमरावती : जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मंगळवारी जागेची पाहणी करताना कार्यक्रमाच्या अनुषंगाने चाचपणी केली आहे. विद्यापीठात या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जागेची पाहणी करताना महापालिका आयुक्त हेमंत पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जाधव, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी भागवत, तहसीलदार सुरेश बगळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.