माजी पदाधिकाऱ्यांनी सुनावले अध्यक्ष उईकेंना खडेबोल
By Admin | Updated: January 5, 2016 00:03 IST2016-01-05T00:03:32+5:302016-01-05T00:03:32+5:30
सध्या जिल्हा परिषदेत विषय समिती वाटपाचा मुद्दा पेटला असतानाच या विषयावर पांघरून पडत नाही.

माजी पदाधिकाऱ्यांनी सुनावले अध्यक्ष उईकेंना खडेबोल
जिल्हा परिषद : विश्वासात न घेता कामात बदल केल्याचा संताप
अमरावती : सध्या जिल्हा परिषदेत विषय समिती वाटपाचा मुद्दा पेटला असतानाच या विषयावर पांघरून पडत नाही. तोच सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांच्या दालनात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे व माजी सभापती मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने यांनी आम्हाला विश्वासात न घेता आम्ही सुचविलेल्या कामात परस्पर बदल केल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत दोन दिवसांत या विषयी निर्णय घ्यावा, अन्यथा अध्यक्षांची खुर्ची बाहेर काढण्यात येईल, असा इशारा दिला.
जिल्हा परिषदेने सदस्यांना विकास कामासाठी वितरीत केलेल्या सुमारे ३० ते ४० लाख रूपयांच्या विकास कामासाठी संबंधित सदस्यांना कामाची यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार सदस्यांनी सुचविलेल्या कामांत विश्वासात न घेताच परस्परच कामात बदल करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे व काही सदस्यांनी केला आहे. याबाबत तातडीने सुचविलेली कामे बदल करून देण्यात यावा, असे खडे बोल अध्यक्षांना सुनावले.
जिल्हा परिषद सदस्यांना निधी वितरित करताना नियोजनापूर्वी सर्व सदस्यांना त्यांच्या मतदार संघातील विकास कामांची यादी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी मागविली होती. त्यानुसार प्रत्येक सदस्यांनी मतदार संघातील कामाच्या याद्या दिल्या आहेत. परंतु या कामात संबंधित सदस्यांना विश्वासात न घेता हा बदल कोणत्या आधारावर करण्यात आला, असा सवाल सुरेखा ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणाऱ्या विकास निधीमध्ये कुठली कामे प्रस्तावित करायची आणि कुठल्या कामात बदल करायचा हा त्याचा अधिकार आहे. तरीही आमच्या अधिकारावर अशा प्रकारे कुरघोडी केली जात असेल तर ते कदापिही सहन केले जाणार नाही, असा इशारा सुरेखा ठाकरे यांनी दिला आहे. सदस्यांनी सुचविलेल्या कामात दोन दिवसात बदल करून मिळावा अन्यथा अध्यक्षांची खुर्ची कक्षा बाहेर काढण्यात येईल, असा इशारा यावेळी अध्यक्षांना सुरेखा ठाकरे, मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)