विद्यापीठाला गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा विसर
By Admin | Updated: June 20, 2016 00:02 IST2016-06-20T00:02:18+5:302016-06-20T00:02:18+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली करण्यात आली. संत गाडगेबाबांनी समाजाला दशसूत्रीचा संदेश दिला आहे.

विद्यापीठाला गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा विसर
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली करण्यात आली. संत गाडगेबाबांनी समाजाला दशसूत्रीचा संदेश दिला आहे. ते स्वत: निरक्षर असताना समाजशिक्षणाचे धडे त्यांनी प्रत्येक गावात जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून गिरवले. त्यामुळे अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाने ३३ वर्षांनंतर यंदा पाणपोई लावण्याचे सौजन्य दाखविले आहे. परंतु अन्य नऊ संदेशाची अंमलबजावणी केंव्हा करणार, असा सवाल सामान्यांचा आहे.
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ चालते. गाडगेबाबा उभ्या आयुष्यात कोणत्याही शाळेत गेले नाही. मात्र त्यांनी समाजाला दिलेला दशसूत्रीचा संदेश हा प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तनीय ठरणारा आहे. संत गाडगेबाबा दिवसा गाव -खेड्यात रस्ते, स्वच्छता करणे तर रात्रीला कीर्तन करून मनुष्याच्या मनातील घाण साफ करण्याचे कार्य आयुष्यभर केले आहे. एवढेच नव्हे तर समाजात जीवन जगताना त्यांनी कोणते कर्तव्य करावे, हे दशसूत्रीच्या माध्यमातून ठरवून दिले आहे. संत गाडगेबाबांनी केलेले महान कार्य हे अवस्मरणीय ठरणारे असताना विद्यापीठ प्रशासनाने गत ३३ वर्षांत केवळ पाणपाई लावून गाडगेबाबांच्या दशसूत्रीची जणू बोळवण चालविली, असे दिसून येते. ज्या महामानवाच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्यात आले त्यांच्याक डून दशसूत्री संदेशाची अंमलबजावणी होऊ नये, ही बाब खेदजनक मानली जात आहे. यावर्षी विद्यापीठ प्रशासनाने ‘तहानलेल्यांना: पाणी’ या संदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारासमोरील दर्शनी भागात पाणपोई सुरू केली आहे. परंतु उर्वरित नऊ संदेशाचे पालन केंव्हा होणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
ही आहे
गाडगेबाबांची दशसूत्री
भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना : पाणी, उघड्यानागड्यांना :वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशू, पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दु:खी निराशांना हिम्मत ही गाडगेबांची दशसूत्री आहेत.