बेमुदत कामबंद संपामुळे वनाची सुरक्षा अधांतरी
By Admin | Updated: August 26, 2014 23:03 IST2014-08-26T23:03:48+5:302014-08-26T23:03:48+5:30
राज्यभरातील वनरक्षक, वनपाल व वनमजुरांनी बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केल्याने वनाची सुरक्षा अधांतरी आहे. जंगलाचे संरक्षण करण्याकरिता स्वत: अधिकाऱ्यांनाच लक्ष दावे लागत आहे.

बेमुदत कामबंद संपामुळे वनाची सुरक्षा अधांतरी
अमरावती : राज्यभरातील वनरक्षक, वनपाल व वनमजुरांनी बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केल्याने वनाची सुरक्षा अधांतरी आहे. जंगलाचे संरक्षण करण्याकरिता स्वत: अधिकाऱ्यांनाच लक्ष दावे लागत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
राज्यभरातील वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मागण्या पूर्ण करण्याकरिता शासनस्तरावर अनेकदा प्रयत्न केले गेले मात्र आजपर्यंत मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांनी २५ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सुमारे १५०० वनरक्षक, वनपाल व वनमजूरांचा सहभाग आहे. त्यामुळे जंगलांच्या संरक्षणाविषयी मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खऱ्या अर्थाने जंगलाचे संरक्षण करण्यात सर्वाधिक सहभाग वनरक्षक, वनपाल व वनमजुरांचा आहे. मात्र तरीसुध्दा शासनाकडून या वनकर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही एक शोकांतिका आहे.
या बेमुदत संपामुळे जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर आली असून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच जंगलात जाऊन देखरेख करावी लागत आहे. बेमुदत संपामुळे जंगलाच्या सुरक्षा करण्याकरिता एकही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे वरिष्ठ अधिकारी चिंतेत पडले आहे. यावर उपाययोजना म्हणून रोजंदारीवर नियुक्ती करण्यात येत आहे. त्यातच स्वत: अधिकाऱ्यांनाच आपआपल्या वनपरिक्षेत्रामध्ये जातीने लक्ष द्यावे लागत आहे. डे-नाईट सेवा देऊन जंगलाचे संरक्षण केले जात असल्याचे वनाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांच्या संप काळातील केलेल्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)