वनमजुराने व्याघ्र प्रकल्पाच्या वाहनाचा केला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:33+5:30
एमएच २७ बी.झेड. ४६२७ क्रमांकाचे चार चाकी वाहन गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले. हे वाहन वनमजूर पृथ्वीराज पवार हे नियमबाह्य चालवीत आहे. सदर वाहन शुक्रवारी सकाळी १० वाजतादरम्यान हरिसालहून चिखलदरा येत असताना कोलकासनजीक सागवानच्या झाडाला धडकले. यात चारचाकी वाहनाच्या पुढचा भाग नादुरुस्त झाला.

वनमजुराने व्याघ्र प्रकल्पाच्या वाहनाचा केला अपघात
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : गुगामल व्याघ्र प्रकल्पाचे वाहन भरधाव चालवून वनमजुराने शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास धारणी मार्गावर अपघात घडवून आणला. यामध्ये रस्त्याच्या कडेला डौलात उभे असलेल्या सागवान झाडाचे दोन तुकडे झाले. अपघातग्रस्त वाहन परतवाड्यातील एका गॅरेजमध्ये आणून दुरुस्तीसाठी लपवून ठेवले.
एमएच २७ बी.झेड. ४६२७ क्रमांकाचे चार चाकी वाहन गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले. हे वाहन वनमजूर पृथ्वीराज पवार हे नियमबाह्य चालवीत आहे. सदर वाहन शुक्रवारी सकाळी १० वाजतादरम्यान हरिसालहून चिखलदरा येत असताना कोलकासनजीक सागवानच्या झाडाला धडकले. यात चारचाकी वाहनाच्या पुढचा भाग नादुरुस्त झाला. अपघाताची कुठेच वाच्यता न होऊ देता परतवाडा येथील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणले होते. हा सर्व प्रकार व्याघ्रप्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी का दडविला, हे अद्याप अनुत्तरित आहे. संबंधित वनमजूर वजा व्याघ्र प्रकल्पाचा स्वयंघोषित चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसांत देण्यात आली नाही, हे विशेष. सदर वाहनदुरुस्तीचा किमान २० ते २५ हजार रुपये खर्च येणार असल्याची शक्यता आहे. सदर वाहन नवीन असल्याने पोलिसांत तक्रार दिली असती तर संबंधित विमा कंपनीकडून त्याच्या दुरुस्तीचा खर्च मिळणे अपेक्षित होते. परंतु वाहन चुपचाप गॅरेजमध्ये लावल्याने त्याचा खर्च संबंधित अधिकारी शासनाच्या तिजोरीतून करणार की स्वत:च्या पगारात, असा सवाल उपस्थित होत आहे.
व्याघ्र नियमाची ऐसी-तैसी
घटांग ते धारणीपर्यंत संपूर्ण परिसर व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारित येतो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा राबता असल्याने वाहनांची तासी वेग मर्यादा २० किलोमीटर ठेवण्यात आली आहे. ठिकठिकाणी गतिरोधक आणि वन्यप्राण्यांना जाण्यासाठी मार्ग म्हणून पदचिन्ह काढण्यात आले आहेत. असे असताना शुक्रवारी गुगामल वन्यजीव विभागाचे वाहन भरधाव वेगाने नियम धाब्यावर ठेवून चालविण्यात आले अपघातात रस्त्याच्या कडेवरील सागवान झाडाची दोन तुकडे झाल्याने वाहनाचा वेग अधिक असल्याचे स्पष्ट होते. व्याघ्र प्रकल्पाचे वाहनच नियम तोडत असल्याने इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाहनाला किरकोळ अपघात झाला. संबंधित चालक वजा वनमजूर मद्यधुंद अवस्थेत होता किंवा नाही याची चौकशी करण्यात येणार आहे. अपघाताची चौकशी करण्यात येईल.
- विशाल माळी,
प्रभारी उपवनसंरक्षक,
गुगामल वन्यजीव विभाग