आमदारांच्या पत्रानंतरही वनविभागाचे बिबट्याला पाठबळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:53+5:302021-06-01T04:10:53+5:30

परतवाडा : मौजा मांजरखेड कसबा शिवारात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्या वाघाचा बंदोबस्त करावा. त्या वाघाला तातडीने पकडण्याची व्यवस्था करावी, ...

Forest department supports leopard even after MLA's letter! | आमदारांच्या पत्रानंतरही वनविभागाचे बिबट्याला पाठबळ !

आमदारांच्या पत्रानंतरही वनविभागाचे बिबट्याला पाठबळ !

परतवाडा : मौजा मांजरखेड कसबा शिवारात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्या वाघाचा बंदोबस्त करावा. त्या वाघाला तातडीने पकडण्याची व्यवस्था करावी, या मागणीचे पत्र आमदार प्रताप अडसड यांनी वनविभागाकडे ५ मार्चला दिले होते. पण, या पत्राकडे दुर्लक्ष करून वनविभागाने चक्क त्या बिबट्यालाच पाठबळ दिले. यातूनच २९ मे ला दुपारी त्या बिबट्याने एका गुराख्यावर हल्ला चढविला. यात तो गंभीर जखमी झाला.

शेतकऱ्यांना या बिबट्याचे दर्शन होत आहे. परिणामी शेतात ये-जा बंद झाल्याने गावकरी संतप्त आहेत, असे या ५ मार्चच्या पत्रात आमदार प्रताप अडसड यांनी म्हटले आहे. पण, या पत्राकडे वनविभागाने दुर्लक्ष केले. बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न न करता उलट त्यालाच पाठबळ दिले. यात पाळीव जनावरांवर हल्ला चढविणारा हा बिबट्या आता गुराख्यासह गावकऱ्यांच्या जिवावर उठला आहे.

आमदार प्रताप अडसड यांच्या या पत्राची अमरावती प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक यांनी दखल घेतली. अमरावती प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षकांना ९ मार्चच्या पत्राद्वारे तसे निर्देश दिले. आमदार प्रताप अडसड यांच्या पत्राच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल विनाविलंब सादर करण्यास सुचविले. पण, मुख्य वनसंरक्षकांच्या निर्देशांकडेही संबंधित वनअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले.

दरम्यान, हे निर्देश देताना मुख्य वनसंरक्षकांची तारांबळ उडाल्याचे त्यांच्या पत्रावरून दिसून येते. बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबतचे पत्र आमदार प्रताप अडसड यांनी दिले. पण, या पत्राचे उत्तर अरुण अडसड यांच्या नावे पाठविले गेले. त्यात त्यांचा ‘विधानसभा सदस्य’ असा उल्लेखही केला गेला. प्रताप अडसड हे अरुण अडसड यांचे चिरंजीव. यात मुलाच्या पत्राला उत्तर वडिलांना पाठविण्याचा विक्रम ही वनविभागाकडून आपल्या दप्तरी नोंदविला गेला.

Web Title: Forest department supports leopard even after MLA's letter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.