वनविभागात सॅटेलाईट फायर अलर्टचे ताळमेळ जुळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:28+5:302021-03-18T04:13:28+5:30
वनक्षेत्राच्या विभागणीनंतरही जुन्याच भागात आगीचे अलर्ट, मासिक, पंधरवाडा, दैंनंदिन अहवाल केवळ खानापूर्ती अमरावती : जंगलक्षेत्रात आग लागल्यास क्षणात याबाबतची ...

वनविभागात सॅटेलाईट फायर अलर्टचे ताळमेळ जुळेना
वनक्षेत्राच्या विभागणीनंतरही जुन्याच भागात आगीचे अलर्ट, मासिक, पंधरवाडा, दैंनंदिन अहवाल केवळ खानापूर्ती
अमरावती : जंगलक्षेत्रात आग लागल्यास क्षणात याबाबतची माहिती सॅटेलाईट किंवा नासामार्फत वनाधिकाऱ्यांना फायर अलर्ट मिळते. मात्र, यंदा वनक्षेत्रात आग लागूनही सॅटेलाईटद्धारे फायर अलर्ट व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. सॅटेलाईच्या फायर अलर्टमध्ये ताळमेळ जुळत नसल्याची वनाधिकाऱ्यांची ओरड आहे.
वनविभागाने जंगलातील आगीची माहिती क्षणात मिळावी, यासाठी डेहरादून येथील भारतीय वनसर्वेक्षण संस्था आणि गुगलवर नासाद्धारे वनपाल, वनपरिक्षेत्राधिकारी, उपवनसंरक्षक यांना मोबाईलवर देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, यंदा फेब्रुवारीपासूनच जंगलात आग लागण्याच्या घटना घडत असताना आगीचे लोकेशन सॅटेलाईटवर व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांना आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गत आठवड्यात अमरावती उपवनसंरक्षक कार्यालय अंतर्गत वडाळी वनपरिक्षेत्रातंर्गत पोहरा- भानखेड येथील जंगलक्षेत्राला आगीच्या विळख्याने वेढले होते. मात्र, सॅटेलाईटचे फायर अलर्ट वेगळ्याच क्षेत्रात दर्शविण्यात आल्याची माहिती आहे. अकोला, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातही जंगलात आग लागल्यानंतर फायर अलर्ट दुसऱ्याच भागाचे दर्शविण्यात आले. त्यामुळे यावर्षी जंगलातील आग कशी आटोक्यात येईल, ही मोठी समस्या आहे. एप्रिल, मे महिन्यात जंगल क्षेत्रांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सॅटेलाईटद्धारे आगीचे फायर अलर्ट अचूक मिळावे, अशी अपेक्षा वनकर्मचाऱ्याची आहे.
---------------
अमरावती विभागात सर्वच वनक्षेत्रात आगीने वेढले
फेब्रुवारीच्या प्रारंभी जंगलात आगीच्या घटना सुरू झाल्या आहेत. मार्चमध्ये यात वाढ झाली. आतापर्यंत जवळपास अमरावती विभागातील मेळघाट, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, अकोला वनक्षेत्राला आगीने वेढल्याची नोंद आहे. जंगलातील आग नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, आगीच्या रौद्ररूपापुढे कर्मचारी हतबल होत असल्याचे वास्तव आहे.
---------------
परिक्षेत्राच्या विभागणीनंतरही जुन्याच क्षेत्रात आगीची नोंद
बहुतांश जिल्ह्यात वनविभागाची विभागणी झाली. मात्र, सॅटेलाईटमध्ये फायर अलर्ट दर्शविताना जुनेच क्षेत्रात आग लागल्याची माहिती मिळत आहे. वनविभाग, वनबीट आणि वनखंडात फायर अलर्टमध्ये ताळमेळ जुळत नसल्याची माहिती आहे. मासिक, पंधरवाडा व दैनंदिन अहवालातही या बाबी वरिष्ठांच्या लक्षात येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
------------
सॅटेलाईटच्या फायर अलर्टमध्ये ताळमेळ जुळत नाही, यासंदर्भात कोणत्याही वनक्षेत्राची तक्रार नाही. फायर अलर्टचा मॅसेज आम्हालाही मिळतो. जेथे आग लागली ते वनखंड, बीट दर्शविले जाते. परंतु, फायर अलर्टबाबत माहिती अचूक मिळत नाही, याबाबत तसे काही असल्यास तपासले जाईल.
- हरिश्चंद्र वाघमोडे, विभागीय वनाधिकारी, अमरावती