‘कॅटरीना’चा छावा अमरावतीच्या जंगलात ?
By Admin | Updated: January 5, 2017 00:13 IST2017-01-05T00:13:24+5:302017-01-05T00:13:24+5:30
पोहरा-चिरोडीत मुक्तसंचार करणारा वाघ हा बोर अभयारण्यातील कॅटरिना वाघीणीचा छावा असू शकतो,

‘कॅटरीना’चा छावा अमरावतीच्या जंगलात ?
बोर अभयारण्य सूत्रांची माहिती : स्थलांतरणानंतर पोहरा-चिरोडीत मुक्तसंचार
अमरावती : पोहरा-चिरोडीत मुक्तसंचार करणारा वाघ हा बोर अभयारण्यातील कॅटरिना वाघीणीचा छावा असू शकतो, असा अंदाज बोर व्याघ्र प्रकल्पातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. कॅटरीना वाघिणचे चार छावे दोन ते तीन महिन्यांपासून दृष्टीस पडत नसल्यामुळे हा अंदाज वर्तविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोहरा-चिरोडीच्या जंगलात वाघाचे वास्तव्य असल्याचे सन २०११ मध्ये स्पष्ट झाले होते. मात्र, त्यावेळी ट्रॅप कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे वाघाचे छायाचित्र काढण्यात आले नव्हते. त्यानंतर सन २०१५ मध्ये पुन्हा वाघ दिसून आला. त्याचे छायाचित्र वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात कैद झाले होते. त्यावेळी तो वाघ बोर अभयारण्यातून आल्याचे वन्यप्रेमी संघटना व वनविभागाने स्पष्ट केले होते. त्याअनुषंगाने आता दिसून आलेला वाघ हा बोर अभयारण्यातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोहरा-चिरोडीत आढळलेल्या वाघाचे छायाचित्र अमरावती वनविभागाने वनविभागाच्या अन्य कार्यालयांकडे पाठविले आहे. वाघांच्या तेथील छायाचित्रांवरून अमरावतीच्या जंगलात आढळलेल्या वाघाची ओळख पटविली जाणार आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरमध्ये ‘कॅटरिना’ नावाची वाघीण वास्तव्यास आहे. तिला चार छावे आहेत. आता तिचे हे छावे दोन ते अडीच वर्षांचे झाले आहेत. मात्र, दोन महिन्यांपासून हे चारही छावे ‘कॅटरीना’ जवळ दिसून आले नाहीत. त्यामुळे ते वेगवेगळ्या दिशेच्या जंगलात गेले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातील एक छावा हा बोर जंगलापासून जवळ असणाऱ्या पोहरा-चिरोडीत आला असावा, असा अंदाज वनविभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. मात्र, अमरावती वनविभागाने याची पृष्ठी केलेली नाही.
स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी बोरमधील या वाघिणीचे नाव ‘कॅटरिना’ ठेवले आहे. कॅटरिनाच्या कॅटवॉकशी यावाघिणीच्या डौलदार चालीचे साधर्म्य वाटल्याने हे नाव ठेवले असल्याची माहिती आहे. वाघ आल्याच्या पार्श्वभूमिवर ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘कॉरिडोअर’ बदलविताना
मार्गावर सोडतात खुणा
प्रत्येक वाघाचे स्वतंत्र कॉरिडोअर असते. ते कॉरिडोअर बदलविताना त्यांच्या मार्गावर वाघ काही खुणा किंवा निशाण सोडून पुढे जातात. त्यांची विष्ठा, मलमूत्र तसेच झाडांवर नखाने ओरबाडल्याच्या खुणा जंगलात आढळून येतात. काही वर्षांपूर्वी पोहरा-चिरोडीत आलेल्या बोर अभयारण्यातील वाघानेही काही निशाण किंवा खुणा सोडल्या असाव्यात. त्या दिशेनेच कॅटरिना वाघीणीचा छावा पोहरा-चिरोडीत आला असावा, असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांचा आहे.