बडनेरालगत वाघाच्या पायाचे ठसे
By Admin | Updated: January 2, 2017 01:04 IST2017-01-02T01:04:47+5:302017-01-02T01:04:47+5:30
बडनेरा शहरालगतच जुना बायपास मार्गावरील मेटकर यांच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.

बडनेरालगत वाघाच्या पायाचे ठसे
परिसरवासीय दहशतीत : वनविभागाने घ्यावी खबरदारी
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
बडनेरा शहरालगतच जुना बायपास मार्गावरील मेटकर यांच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी रस्ता ओलांडताना काहींनी वाघाला पाहोल्याचे बोलले जात आहे. शहरालगत व कोंडेश्वर परिसरात बिबट तसेच पट्टेदार वाघाचा मुक्त संचार असल्याने परिसरवासीय दहशतीत वावरत आहेत.
पोहरा जंगलात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी तशी खबरदारी बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून केली जात आहे.
पोहऱ्यातून आल्याचा संशय
बडनेरा : पोहरा-चिरोडी जंगलात लागूनच कोडेश्वर गोविंदपूर परिसर आहे. या परिसरात बिबट असल्यचे अनेकांनी पाहिले आहे. रात्रीच्या वेळेस गोविंदपूर मार्गे जाणाऱ्या भागात बिबटाच्या ओरडण्याचा आवाज ऐकवयास येत असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच अगदी बडनेरा शहरापासून जाणाऱ्या जुन्या बायपास मार्गावरील रवींद्र मेटकर यांच्या शेतात पट्टेदार वाघाच्या पायाचे ठशे दिसून पडले. तसेच याच मार्गावर अंजनगाव बारी येथील तांबळे नामक इसमाने पहाटेच्या सुमारास अमरावतीकडे जात असताना वाघास पाहिल्याचे बोलून दाखविले.जुना बायपास मार्गापासून सर्व जंगलाचा भाग आहे. लगतच कोंडेश्वर, गोविंदपूर जंगलाचा परिसर आहे. व त्याला लागूनच पोहरा जंगल असल्याने त्या परिसरातील पट्टेदार वाघ बडनेरा शहरापर्यंत येत असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. वनविभागाने रवींद्र मेटकर यांच्या शेतातील वाघाच्या पायाचे ठशे तपासावेत तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असे शहरवासीयांमध्ये बोलल्या जात आहे. पट्टेदर वाघाच्या ठश्यांमुळे बडनेरावासीय दहशतीत वावरत आहेत. जुना बायपास, एक्सप्रेस हायवे तसेच कोंडेश्वर परिसरात बिबट किंवा पट्टेदार वाघ दृष्टिस पडल्यास अनेक घटना आहेत. मागील वर्षी गोविंदपूर भागात बिबटाने पाळीव प्राण्यांवर लक्ष्य केल्याचे देखील सत्य समोर आले आहे.