बंद पाळला, अत्यावश्यक सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST2021-04-07T04:13:19+5:302021-04-07T04:13:19+5:30

अमरावती : राज्य शासनाने सोमवारी काढलेला लॉकडाऊनचा आदेश अमरावती महानगरातील व्यापाऱ्यांनी पाळला. मंगळवारी सकाळी ७ ते ९ वाजता अत्यावश्यक ...

Followed off, resumed essential services | बंद पाळला, अत्यावश्यक सेवा सुरू

बंद पाळला, अत्यावश्यक सेवा सुरू

अमरावती : राज्य शासनाने सोमवारी काढलेला लॉकडाऊनचा आदेश अमरावती महानगरातील व्यापाऱ्यांनी पाळला. मंगळवारी सकाळी ७ ते ९ वाजता अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य दुकाने, प्रतिष्ठाने बंद उघडण्यात आली नव्हती. बडनेरा, अमरावती या दोन शहरांत ‘लोकमत’ चमूने ‘रिॲलिटी चेक’ केले असता, ही वस्तुस्थिती निदर्शनास आली.

सोमवारी रात्री ८ पासून राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, या आदेशाबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम कायम होते. गेल्या मार्च महिन्यात अमरावती जिल्ह्याने १५ दिवस लॉकडाऊन सोसले. मजूर, कामगार, शेतमजूर रोजगारासाठी त्रस्त असताना, आता पुन्हा लॉकडाऊन कशासाठी, असा सवाल काही कामगारांनी ‘लोकमत’कडे उपस्थित केला. अत्यावश्यक सेवा वगळता, इतर कोणतेही दुकान, प्रतिष्ठान सुरू ठेवता येणार नाही, ही बाब सुधारित आदेशाने स्पष्ट केली आहे. परंतु, अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक नसताना व्यापारी, दुकानदार, कामगार, मजूर, गरिबांना कशाला वेठीस धरता, अशा तीव्र भावना मंगळवारी ‘लॉकडाऊन’नंतर उमटल्या. मात्र, दिवसभर औषधी, उपाहारगृहे, किराणा दुकान, दूध डेअरी आदी अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.

----------------------

पहाटे भ्रमंतीला पसंती

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पहाटे भ्रमंतीसाठी नागरिकांनी पसंती दर्शविली. येथील मालटेकडी, विभागीय क्रीडा संकुल, मार्डी मार्ग, बडनेरा रोड, जुने बायपास, दस्तुरनगर ते भानखेडा मार्गावर नागरिक दिसून आले.

---------------

महापालिका सफाई कामगारांनी बजावले कर्तव्य

लॉकडाऊनचा कोणताही परिणाम साफसफाईवर झाला नाही. सकाळी ७ ते ९ वाजता महापालिका सफाई कर्मचारी कर्तव्य बजावत होते. नियमित साफसफाईत कोणताही खंड पडला नाही. चौकाचौकांत स्वच्छता करण्यात महिला, पुरुष मग्न होते.

------------------

फळविक्रेत्यांमध्ये लॉकडाऊनबाबत संभ्रम

येथील ईतवारा बाजार, कॉटन मार्केट, चित्रा चौक या भागांत हातगाड्यावर विक्री करणाऱ्या फळविक्रेत्यांमध्ये लॉकडाऊनबाबत संभ्रम दिसून आला. शासनादेशात फळविक्रीचा उल्लेख नव्हता. त्यामुळे मंगळवारी सकाळी फळविक्रीच्या हातगाड्या गुंडाळून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, लॉकडाऊनच्या सुधारित आदेशात फळविक्रीचा उल्लेख असल्याची माहिती मिळताच हातगाडीवर फळविक्री करणाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

-----------

मुख्य चौकांमध्ये उशिरा ‘पोझिशन’

लॉकडाऊन जाहीर झाले असताना, महानगराच्या मुख्य चौकात सकाळी ७ ते ९ दरम्यान पोलीस नव्हते. एरवी गजबजलेल्या राजकमल चौकातही हीच स्थिती होती. गांधी चौक, सराफा बाजार, जवाहर गेट, ईतवारा बाजार, चित्रा चौक, सक्करसाथ, सरोज चौक, जयस्तंभ चौक, रॉयली प्लॉट, पंचवटी चौक, कॉटन मार्केट येथेही पोलीस दिसून आले नाही.

--------------

कॉटन मार्केट परिसरात गर्दी

लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी येथील कॉटन मार्केट परिसरात भाजीपाला, फळ खरेदीसाठी विक्रेत्यांची गर्दी होती. जणू कॉटन मार्केटमध्ये कोरोनाची भीती नाही, असे चित्र सकाळी ७ ते ९ या वेळेत होते. जिल्हाभरातून फळांच्या खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी आल्याचे चित्र हाेते.

-------------

पोलीस बँड पथकाकडून कोरोना जनजागृती

कॉटन मार्केट चौकात पोलीस बँड पथकाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. मास्कचा

वापर करा, शारीरिक अंतर ठेवा, गर्दी करू नका, असा संदेश बँड पथकाने दिला. देशभक्तीपर गीतांनी नागरिकांची लक्ष वेधण्यात आले.

Web Title: Followed off, resumed essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.