शेतकऱ्यांचा भरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:14 IST2017-05-30T00:14:21+5:302017-05-30T00:14:21+5:30
स्थानिक बाजार समितीत रोज विक्री होणाऱ्या मालाचे चुकारे अडते करीत असताना खरेदीदाराकडून आठ ते दहा दिवस पेमेंट मिळत नाही.

शेतकऱ्यांचा भरडा
अमरावती बाजार समितीचा लिलाव ठप्प : मालाची आवक ,विक्री मात्र नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक बाजार समितीत रोज विक्री होणाऱ्या मालाचे चुकारे अडते करीत असताना खरेदीदाराकडून आठ ते दहा दिवस पेमेंट मिळत नाही. या वादात तोडगा न निघाल्याने सोमवारी बाजार समितीमध्ये सहा हजार पोत्यांची आवक झाली, मात्र खरेदीदार पुढेच न आल्यामुळे लिलाव झालेच नाही. परिणामी या दोन घटकांच्या वादात शेतकरी नाहक भरडला जात आहे.
अमरावती बाजार समितीत दररोज १० हजार पोत्यांची आवक होते. खरेदीदारांनी लिलावात माल खरेदी केल्यानंतर त्याचे चुकारे त्याच दिवशी अडते करतात. अडत्यांना आठ दिवसांनी खरेदीदार पेमेंट करतात, अशी प्रथा बाजार समितीत पूर्वापार सुरू आहे. अलीकडे मात्र खरेदीदारांचे चुकारे उशिरा होऊ लागले. खरेदीदारांनी अडत्यांना दिलेले धनादेश बाऊंस व्हायला लागलेत. परिणामी अडते व शेतकऱ्यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह लागले. त्यामुळे अडत्यांनी या वादावर तोडगा काढण्याची विनंती जिल्हा प्रशासन व बाजार समिती प्रशासनाला २४ मे रोजी निवेदनद्वारे केली आहे. त्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये १५ दिवसांत खरेदीदारांनी अडत्यांना चुकारे द्यायचे असे ठरले. मात्र यामध्ये अडत्यांचे समाधान न झाल्याने पुन्हा सोमवारी अडते व बाजार समिती प्रशासनाची बैठक झाली. यामध्ये खरेदीदार उपस्थित झाले नाहीत. तसेच बाजार समिंतीमध्ये आवक झालेल्या मालाच्या खरेदीसाठी खरेदीदार पुढे न आल्याने सोमवारी मालाचा लिलाव झाला नसल्याची माहिती अडत्यांनी दिली. दरम्यान सोमवारी आलेला सहा हजार पोते माल अडत्यांव्दारा सुरक्षित ठेवण्यात आले. ज्या शेतकऱ्यांना निकड होती, त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत अडत्यांव्दारा करण्यात आली. मात्र वादावर तोडगा न निघाल्याने सध्यातरी बाजार समितीचे लिलाव ठप्प झाले आहे.