विश्वास मताकडे लागले जुळ्या शहराचे लक्ष

By Admin | Updated: August 6, 2015 01:29 IST2015-08-06T01:29:52+5:302015-08-06T01:29:52+5:30

स्थानिक ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीचा फैसला ७ आॅगस्ट रोजी होणार आहे. ३४ नगरसेवकांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वास प्रस्तावाबाबतचे निवेदन देण्यात आले होते.

The focus of the twin city started with confidence vote | विश्वास मताकडे लागले जुळ्या शहराचे लक्ष

विश्वास मताकडे लागले जुळ्या शहराचे लक्ष

लोकमत विशेष

विशेष सभा बोलावली : ७ आॅगस्टला अचलपूर नगराध्यक्षाचा फैसला
नरेंद्र जावरे अचलपूर
स्थानिक ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीचा फैसला ७ आॅगस्ट रोजी होणार आहे. ३४ नगरसेवकांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना अविश्वास प्रस्तावाबाबतचे निवेदन देण्यात आले होते. त्यावर ७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलविण्यात आली आहे.
अचलपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीचा वाद गत आठवड्यापासून चांगलाच रंगला आहे. अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहराची लोकसंख्या दीड लाखांच्या जवळपास असून ३८ नगरसेवक निवडून आले आहेत. जुळ्या नगरीतील बोटावर मोजता येणाऱ्या प्रभागांमध्येच सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. उर्वरित प्रभागांमध्ये मात्र समस्यांचा ढीग आहे. पाणी, वीज, कचरा आदी समस्या प्रश्न कायम असून तशी प्रभागातील नागरिकांची ओरड आहे.
‘विश्वास’ ७ आॅगस्टला बसणार
३० जुलै रोजी नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांचे विरुध्द ३४ नगरसेवकांनी अविश्वास दर्शवित जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना माजी नगराध्यक्ष अरूण वानखडेंना तसे निवेदन दिले होते. २२ जुलै रोजी नंदवंशी यांना नगराध्यक्षपदी एक वर्ष पूर्ण झाले. वर्ष पूर्ण झाल्यानंतर अविश्वास ठराव आणता येतो. अर्थातच आर्थिक कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून वाट पाहणारे काही नगरसेवक चांगलेच संतापले होते. विकास कामे होत नसल्याचा आरोप करण्यात आला. आता सात दिवसानंतर नगराध्यक्षावरील अविश्वास ‘विश्वास’ म्हणून परतणार असल्याची चर्चा नगरपालिका वर्तुळात बरीच बोलकी ठरली आहे.
खुर्ची हलताच पडतात पैसे
अचलपूर नगरपालिका नगराध्यक्षाची खुर्ची काही नगरसेवकांसाठी घरखर्च चालविण्याची बँक ठरली आहे. एटीएममध्ये कार्ड टाकावे लागते. येथे नगराध्यक्षांची खुर्ची हलली की नोटांचा पाऊस पडतो, हा नेहमीचा अनुभव शहरवासीयांना आहे. अविश्वासाची गडद छाया या खुर्चीवर सतत असते. नगरसेवकांचा पोळा फुटतो. स्वाक्षरी मोहीम राबविल्या जाते. यातून शेगावीचा गजानन किंवा शिर्डीचा साईबाबा प्रसन्न झाला की परतीच्या प्रवासात रिकामे खिसे भरले जातात. त्यामुळे जुळ्या शहरात आता ‘खुर्ची’ हिलाओ पैसे खिलाओ’ चा नारा चर्चिला जात आहे.
आपली बाजू भक्कम -नगराध्यक्ष
ज्या नगरसेवकांना जुळ्या शहराचा विकास पाहिजे ते आपल्या सोबत आहेत. काहींनी यात राजकारण करण्याचा प्रयत्न केला. तो फसला. येत्या ७ तारखेला अविश्वासाबद्दल विशेष सभा बोलविण्यात आली असली तरी आपली बाजू भक्कम आहे. सर्व नगरसेवक आपल्या बाजूने आहेत. अविश्वास ठराव बारगळणार असल्याचा आपणास पूर्ण विश्वास असल्याचे मत नगराध्यक्ष नंदवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

Web Title: The focus of the twin city started with confidence vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.