उड्डाणपूल बेवारस
By Admin | Updated: July 8, 2017 00:06 IST2017-07-08T00:06:05+5:302017-07-08T00:06:05+5:30
राजापेठ ते इर्विन चौक उड्डाणपूलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

उड्डाणपूल बेवारस
खड्डे, केरकचऱ्याचा वेढा : देखभाल करणाऱ्या प्रशासनाची डोळेझाक
वैभव बाबरेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ ते इर्विन चौक उड्डाणपूलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. अमरावती शहराचा मानबिंदू ठरलेल्या उड्डाणपुलाच्या देखभालीची जबाबदारी कुणाची, याबाबत प्रचंड संभ्रम असल्याने नेमका जाब विचारावा तरी कुणाला, असा सवाल अमरावतीकरांसमोर उपस्थित झाला आहे.
या उड्डाणपुलावरून एक फेरफटका मारला असता या पूलाकडे किती दुर्लक्ष होत आहे, याची कल्पना येते. पूलाच्या पायथ्याशी मोठा खड्डा पडला असून खड्डयाशेजारीच पोलिसांचे बॅरिकेट्स पडून आहेत. त्यामुळे वाहनांना ये-जा करताना अगदी कमी जागा मिळते. ठिकठिकाणी पडलेला केरकचरा या पुलाच्या सौंदर्याला बाधा पोहोचवित आहे. पूलाची एकूणच अवस्था पाहून या पूलाचे ‘मेंटेनन्स’ बऱ्याच दिवसांपासून झालेले नाही, याची खात्री पडते.
यामुळे या उड्डाणपुलाचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात महापालिका, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उड्डाणपुलाची देखरेख नेमकी कोणाच्या अख्त्यारीत येते, ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही.
यामार्गाने दररोज अनेक प्रशासकीय अधिकारी ये-जा करतात. मात्र, त्यांच्याही लक्षात ही बाब येऊ नये, याबाबत आश्चर्य वाटते. शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या कार्यकाळात शहरात दोन उड्डाणपूल आकारास आले. हे उड्डाणपूल अमरावतीकरांसाठी सोयीचे ठरले आहेत. मात्र, निर्मितीनंतर या पूलावरून खाली कोसळून अनेक अपघात झाले. त्यात १० ते १२ जणांचे प्राण गेले. यामुळे उड्डाणपुलावर गतिरोधक बसविण्यात आलेत. उड्डाणपुलावर गतिरोधक तयार करण्याचा देशातील बहुधा पहिलाच प्रकार असावा. त्यानंतर वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी या उड्डाणपुलाच्या वळणावर लोखंडी कठडे बसविण्यात आलेत. त्यानंतर अपघातांची संख्या कमी झाली असली तरी अद्यापही अपघात घडतच आहेत. उड्डाणपूलावरून वाहतुकीची वेग मर्यादा ४० किमी. प्रती तास असतानाही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून ८० ते १००च्या वेगाने वाहने पिटाळताना दिसून येतात. या धोकादायक प्रकारावर अंकुश लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही.
आता तर हा उड्डाणपूल पूर्णत: बेवारस असल्याचे दिसून येते.मागील कित्येक दिवसांपासून या उड्डाणपूलाची देखभाल-दुरूस्ती करण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेला रस्ता, पाणी वाहून जाण्यासाठी ठेवलेल्या जागेवर उगवलेले गवत, अस्तव्यस्त पसरलेला केरकचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, दिशादर्शक फलकांची झालेली वाताहत, कालौघात नाहिसे झालेले झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे अशी काहीशी या पूलाची अवस्था आहे. इतकेच नव्हे तर अनेकदा या पूलावर दारूच्या रिकाम्या बाटल्या सुद्धा आढळतात.फोटोसेशनसाठी तर तरूणाईचे आवडते ठिकाण झाले आहे. मात्र, त्यातून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. राजापेठकडून इर्विन चौकाकडे जाणाऱ्या या उड्डाणपूलावर चढताना दोन्ही बाजुने बॅरिकेट्स लावले आहेत. मात्र, सद्यस्थितीत हे बॅरिकेट्स वाहनांच्या वर्दळीमुळे तुटले आहेत. या पूलावरून अशाप्रकारे धोकादायक व जीवघेणी वाहतूक सुरू आहे.
देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची ?
राजापेठ ते इर्विनच्या मच्युरी पॉईन्टपर्यंतच्या उड्डाणपूलाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. बांधकामाला बराच कालावधी उलटला आहे. दरम्यान एमएसआरडीसीकडून हा उड्डाणपूल महापालिकेकडे हस्तांतरित केला जाणार होता. मात्र, टोल नाक्याच्या वादातून ही प्रक्रिया रखडली. त्यामुळे महापालिकेकडून या पूलाकडे लक्ष दिले जात नाही. पीडब्ल्यूडीचे अधिकारी मात्र हा पूल देखभालीसाठी महापालिकेकडे हस्तांतरित केल्याचे सांगतात. महापालिका आणि पीडब्ल्यूडीद्वारे जबाबदारी झटकली जात असल्याने या पूलाच्या दुरवस्थेसाठी जबाबदार कोण, हे कळेनासे झाले आहे. अनेकदा बैठकींमध्ये हा मुद्दा चर्चेला येतो. मात्र, त्यावर अद्यापही समाधानकारक तोडगा निघालेला नाही.
उड्डाणपुलाची सर्वस्वी जबाबदारी पीडब्ल्यूडीकडे आहे. महापालिकेकडे केवळ स्वच्छतेची जबाबदारी आहे.
- हेमंत पवार, आयुक्त.
उड्डाणपुलाची जबाबदारी महापालिकेकडे आहे. महापालिकेचे अभियंतेच त्याबाबत सांगू शकतील.
- एस.आर.जाधव,
कार्यकारी अभियंता, साबांवि.
पीडब्ल्यूडीच्या म्हणण्यानुसार उड्डाणपूल हस्तांतरित केला आहे. मात्र, त्यासंबंधी दस्तऐवज पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही.
- जीवन सदार,
प्रभारी अतिरिक्त शहर अभियंता.