पूरग्रस्तांनी थाटली जिल्हा कचेरी समोर राहुटी
By Admin | Updated: August 27, 2014 23:13 IST2014-08-27T23:13:04+5:302014-08-27T23:13:04+5:30
मागील आठ वर्षांपासून पूरग्रस्त पुनर्वसनासाठी लढा देणाऱ्या वलगाव आणि रेवसा येथील अन्यायग्रस्त पूरग्रस्तांनी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर तुराटीच्या झोपड्या बांधून अभिनव आंदोलनला प्रारंभ केला आहे.

पूरग्रस्तांनी थाटली जिल्हा कचेरी समोर राहुटी
अमरावती : मागील आठ वर्षांपासून पूरग्रस्त पुनर्वसनासाठी लढा देणाऱ्या वलगाव आणि रेवसा येथील अन्यायग्रस्त पूरग्रस्तांनी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर तुराटीच्या झोपड्या बांधून अभिनव आंदोलनला प्रारंभ केला आहे.
वलगाव आणि रेवसा या गावालगत असलेल्या पेढी, रेणुका नदीला २००७ मध्ये महापुरांचा तडाखा बसून गावातील सुमारे ७०० कुटुंब प्रभावित झाले होते. घरे वाहून गेलीत, शेती खरडून निघाली. प्रचंड नुकसानीचा सामना गावकऱ्यांना करावा लागला होता. तेव्हापासून आजपर्यंत या पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. वलगाव व रेवसा येथील पूरग्रस्तांचे पुनर्वसन त्वरित करावे, यासाठी प्रशासनासह शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. पुनर्वसनाच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारपासून अन्यायग्रस्त पूरग्रस्तांनी न्यायासाठी जिल्हाकचेरी समोर तुराटीच्या झोपड्या थाटून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या आंदोलनात बसपचे प्रमोद तसरे, प्रशांत पाटील, शैलेश सुपारे, चंदू भगत राजेंद्र हजारे, रवींद्र पळसपगार, जगदीश भटकर, सुनील सावरकर, भारत तसरे, सत्यपाल रंगारी, रमेश तसरे, संदीप गेडाम, दीपक खोब्रागडे, अक्षय गजभिये आदी नागरिकांचा समावेश आहे.