इर्विनमध्ये रुग्णांचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 00:02 IST2016-07-10T00:02:56+5:302016-07-10T00:02:56+5:30

जिल्ह्याभरातील गोरगरिब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचा महापूर आलाय.

Flood of patients in Irvine | इर्विनमध्ये रुग्णांचा महापूर

इर्विनमध्ये रुग्णांचा महापूर

अतिरिक्त भार : सहा महिन्यांत १ लाख ४२९ रुग्ण दाखल
वैभव बाबरेकर अमरावती
जिल्ह्याभरातील गोरगरिब रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचा महापूर आलाय. मागील सहा महिन्यात दिड लाखांवर रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी तब्बल १ लाख ४२९ रुग्णांना दाखल करून त्यांना योग्य आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. याच कालावधीत ६०१ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयामार्फत रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र आपातकालीन किंवा गंभीर रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव शासकीय रुग्णालय आहे.
या रुग्णालयातील बाह्यरुग्ण कक्ष व ट्रामा केअर युनिट या दोन कक्षात प्रथम रुग्णांची नोंद होते. यामध्ये १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत लाखांवर रुग्णांच्या नोेंदी झाल्या आहेत. ट्रामा केअरमध्ये ३३ हजार ६२९ रुग्णांपैकी २३ हजार ३७६ रुग्णांना दाखल करण्यात आले. आंतर रुग्ण (आयपीडी) कक्षात १ लाख रुग्णांपैकी ७७ हजार ५३ रुग्णांना दाखल करून त्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावरून जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याविषयी समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. इर्विन रुग्णालयात गोरगरिब नागरिकांना आरोग्य सेवा योग्यरित्या पुरविल्या जात असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाखांवर आहे, तर शहराची लोकसंख्या जवळपास ८ लाखापर्यंत आहे. इर्विनमध्ये दरदिवसाला जवळपास ५०० रुग्ण उपचाराकरिता येतात. तसेच जवळपास १ हजारावर रुग्ण खासगी रुग्णालयात उपचाराकरिता जातात. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास दिड लाखांवर रुग्ण आजारी असल्याचे दिसून येते आहे. त्यामध्ये सर्वाधिक भार हा जिल्हा सामान्य रुग्णालयावर आहे. इर्विनमध्ये मनुष्यबळाचा अभाव असतानाही तेथील कामकाज योग्यरित्या होत आहे. एखाद्या तुरळक प्रसंगीच रुग्णांचे नातेवाईक आक्षेप घेताना आढळून आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरले आहे.

रुग्णांना नवसंजीवनी देणारे 'इर्विन'
खासगी रुग्णालयात दाखल करण्यात न आलेल्या रुग्णांना इर्विनमध्ये दाखल करून घेतल्या जाते. सर्पदंश, विष प्राशन केलेल्या रुग्णांवर, तर विशेष उपचार केले जातात. यामध्ये सर्वाधिक रुग्णांना आजपर्यंत जीवदान मिळाले आहे. अनेकदा गळफास घेतलेले रुग्णही बरे होऊन परतले आहेत. डे केअर सेन्टर व आयसीयूत रुग्णांची योग्य देखभाल करण्यात येते. यात नेत्रविभागाचे योगदान सर्वात मोलाचे आहे. अनेकांना दृष्टी मिळून देण्याचे कार्य नेत्र विभाग प्रमुख नम्रता सोनोने यांच्या चमुुने केले आहे. बालरोग विभागात बालकांवर योग्य उपचार केले जातात. हा वार्ड स्वच्छ व सुंदर बनविण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातून सर्वदुरच्या रुग्णांवर उपचार करण्यात इर्विन अव्वल ठरले आहे. याखेरिज नजीकच्या मध्यप्रदेशातील रुग्णांवरही उपचार करण्यात आले आहे. डॉक्टर व परिचारिका आरोग्य सेवा पुरविण्यात परिश्रम घेत असल्याने रुग्णांना जीवदान मिळत असल्याची माहिती सीएस अरुण राऊत यांनी दिली.

६०१ मृतदेहांचे शवविच्छेदन
विविध घटना, गुन्हे व विविध आजारांनी मृत पावलेल्यांचे शवविच्छेदन इर्विन रुग्णालयात करण्यात येते. मागिल सहा महिन्यात इर्विनमध्ये ६०१ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आलेले आहे. शवविच्छेदनासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याने मृतांच्या कुटुंबियांची होरपळ थांबली आहे.

अन्य राज्यातील
रुग्ण अमरावतीत
जिल्हाभरातील रुग्ण इर्विनमध्ये दाखल होतातच, तसेच राज्य व शहराबाहेरील रुग्णांना सुध्दा इर्विनमध्येच दाखल केल्या जात आहे. जिल्ह्याच्यालगतच मध्यप्रदेशाची सिमा असल्याने तेथील अनेक रुग्ण इर्विनमध्ये दाखल केले जातात. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयावरील रुग्णांचा भार दिवसेंदिवस वाढू लागला आहे.

परिचारिकांचे मोलाचे योगदान
इर्विन रुग्णालयात आरोग्य सेवा पुरविण्यात परिचारिकांचे मोलाचे योगदान आहे. अधिसेविका मंदा गाढवे यांच्या मार्गदर्शनात जवळपास दिडशे परिचारिका रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी सांभाळतात. दररोज दाखल होणाऱ्या ४०० ते ५०० रुग्णांना दिवसरात्र आरोग्य सेवा पुरविण्याचे काम परिचारिका सातत्याने करीत आहेत.

Web Title: Flood of patients in Irvine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.